– किमान वेतनापासून सफाई कामगार वंचित; दोन महिन्यांत वेतनवाढीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगितकर्मचारी
The Exposer
नागपूर : बेसा-पिपळा नगरपंचायतीतील सफाई कामगारांनी वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून परिसरातील स्वच्छता व्यवस्था अक्षरशः ठप्प झाली होती. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात उडी घेत कामगारांच्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे आक्रमक भूमिका मांडल्यानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत वेतनवाढीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सफाई कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून आजपासून पुन्हा काम सुरू केले.

बेसा-पिपळा नगरपंचायतीअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत सफाई कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला. अनेक वर्षांपासून वेतनवाढ झालेली नसून कामगारांना वेतनाची पावतीदेखील दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच ईएसआयसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि अन्य सामाजिक सुरक्षा सुविधांपासून कामगार वंचित असल्याचा आरोपही करण्यात आला.
वेतनवाढीसाठी वारंवार मागणी करूनही ठोस निर्णय होत नसल्याने संतप्त सफाई कामगारांनी चार दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन सुरू केले. परिणामी नगरपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिली. नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.
या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर (पाटील) यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली. मनसेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर करून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, वेतन पावती, ईएसआयसी, पीएफसह आवश्यक सुविधा आणि कथित आर्थिक शोषणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कामगारांच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत प्रशासनाने वेतनवाढीसाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितल्याची माहिती आहे. दोन महिन्यांत वेतनवाढ करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सफाई कामगारांनी नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित केले आणि आजपासून पुन्हा स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली.
मात्र, दोन महिन्यांत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता प्रशासन आश्वासनाची अंमलबजावणी करून सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन देते की पुन्हा वेळकाढूपणाची भूमिका घेते, याकडे कामगारांसह बेसा-पिपळावासीयांचे लक्ष लागले आहे.
दोन महिन्यांचे आश्वासन की पुन्हा वेळकाढूपणा?
चार दिवसांच्या कामबंद आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत वेतनवाढ करण्याचे आश्वासन दिल्याने सफाई कामगार कामावर परतले आहेत. मात्र, किमान वेतन, वेतन पावती, पीएफ आणि ईएसआयसीसारख्या मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय कधी होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











