– व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा FIR मध्ये आरोप; तरीही IT Act चे एकही कलम नाही – अटकेबाबतही प्रश्नचिन्ह
The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात घडलेल्या कथित प्रकारानंतर बजाजनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी महिला या धर्मगुरू असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, अपमान, अंगावरील वस्त्र ओढण्याचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी तसेच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी BNS कलम 74, 76, 296, 351(2), 352 व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. माया उके व मंगला उईके अशी आरोपी महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे, FIR मध्ये गंभीर कलमे नमूद असूनही दोन्ही आरोपी महिलांना तात्काळ अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाची दिशा आणि अटकेबाबत पोलिसांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
कायदेतज्ज्ञांच्या मते, FIR दाखल झाली म्हणजे अटक करणे बंधनकारक नसते. आरोपी पळून जाण्याची शक्यता, पुरावे नष्ट होण्याचा धोका, साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता किंवा कोठडीची आवश्यकता यांसारख्या बाबींचा विचार करूनच अटकेचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे गंभीर कलमे असली तरी तात्काळ अटक न होणे हे कायद्याच्या चौकटीत शक्य आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फिर्यादीने तक्रारीत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला असला, तरी माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) अंतर्गत एकही कलम FIR मध्ये नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे डिजिटल पुरावे अद्याप उपलब्ध झाले नाहीत का, की तपासानंतर पूरक कलमे जोडली जाणार आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
FIR मधील कलमांनुसार या प्रकरणात महिलेच्या शीलाचा अपमान, लैंगिक छळ, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, गुन्हेगारी धमकी, जाणीवपूर्वक अपमान आणि समान हेतूने गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ तयार करून समाज माध्यमावर व्हायरल कुणी केला, हा सुध्दा पोलिसांच्या तपासाचा भाग झाला आहॆ. या सर्व आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे. या दोन्ही आरोपी महिलांना दीक्षाभूमी सह कॉलेज परिसरात कुणी फोन करून सोबत आणले. आणि कशासाठी आणले, यासाठी दोघींचा मोबाईल सिडीआर काढून संबंधित व्यक्तीला सुध्दा या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी आहॆ. यासंदर्भात महिलांच्या एका शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन आरोपीविरुद्ध वेळीच कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी केली होती, हे विशेष.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी महिला आणि फिर्यादी महिला असल्याने महिला विरुद्ध महिला अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात BNS मधील संबंधित कलमांचा वापर, IT Act ची अनुपस्थिती आणि अटकेतील विलंब या मुद्द्यांवर कायदेशीर वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











