विदर्भासाठी ‘गामा नाईफ रेडिओसर्जरी’ची गरज; मुंबईपुरती मर्यादित उपचारपद्धती नागपुरातही उपलब्ध व्हावी!

– नागपूरातील एम्ससह सुपर स्पेशालिटीत अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची मागणी

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेण्याची अपेक्षा

The Exposer
नागपूर : मेंदूतील ट्युमर, आर्टेरिओव्हेनस मॉलफॉर्मेशन (AVM), ट्रायजेमिनल न्युराल्जिया, अ‍ॅकॉस्टिक न्युरोमा तसेच मेंदूतील इतर अनेक गुंतागुंतीच्या विकारांवर शस्त्रक्रियेशिवाय अत्यंत अचूक उपचार करण्यासाठी गामा नाईफ रेडिओसर्जरी हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान जगभरात प्रभावी आणि विश्वासार्ह मानले जाते. अत्यंत अचूक किरणोत्सर्गाद्वारे मेंदूतील आजारग्रस्त भागावर उपचार करण्याची ही पद्धत अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

परंतु महाराष्ट्रात ही सुविधा मुंबईतील काही मोजक्या खाजगी रुग्णालयांपुरतीच मर्यादित असल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच शेजारील छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील हजारो रुग्णांना उपचारासाठी मुंबई गाठावी लागते. त्यामुळे उपचाराचा खर्च, प्रवास, राहण्याचा खर्च आणि मानसिक तणाव यांचा मोठा भार रुग्ण व त्यांच्या कुटुंबांवर पडतो.

नागपूर हे विदर्भाची उपराजधानी असून शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय, मेडिकल, एम्स आणि इतर उच्चस्तरीय वैद्यकीय संस्था येथे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत नागपूरच्या शासकीय रुग्णालयात गामा नाईफ रेडिओसर्जरी यंत्रणा सुरू करणे ही केवळ विदर्भाची नव्हे, तर संपूर्ण मध्य भारताची गरज बनली आहे.

या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक रुग्णांमध्ये पारंपरिक मेंदूची शस्त्रक्रिया टाळता येते. भूल, मोठा चीरा किंवा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल राहण्याची गरज अनेकदा भासत नाही. अत्यंत अचूक किरणोत्सर्गामुळे मेंदूतील आजारग्रस्त भागावर लक्ष केंद्रित करून उपचार करता येतात. त्यामुळे निरोगी ऊतींचे नुकसान कमी होते, गुंतागुंत कमी राहते आणि रुग्ण लवकर पूर्ववत जीवन जगू शकतो.

आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरण ही राज्य शासनाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. नागपूरमध्ये एम्स, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, कॅन्सर उपचार केंद्र आणि इतर अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याच धर्तीवर गामा नाईफ रेडिओसर्जरीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास विदर्भाच्या आरोग्य क्षेत्रात नवे पर्व सुरू होऊ शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, मेट्रो, एम्स, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे विदर्भातील गंभीर रुग्णांच्या हिताचा विचार करून शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गामा नाईफ रेडिओसर्जरी यंत्रणा मंजूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

ही सुविधा सुरू झाल्यास विदर्भातील रुग्णांना मुंबईपर्यंत धाव घेण्याची वेळ येणार नाही. उपचाराचा खर्च कमी होईल, वेळेवर उपचार मिळतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही अत्याधुनिक आरोग्यसेवा सहज उपलब्ध होईल. याचबरोबर नागपूर हे मध्य भारतातील न्यूरोसायन्स आणि अत्याधुनिक मेंदू उपचारांचे प्रमुख केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकते.

आज गरज आहे ती निर्णयक्षम नेतृत्वाची. विदर्भातील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून नागपूरच्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गामा नाईफ रेडिओसर्जरी सुविधा मंजूर करण्याचा निर्णय घेतला, तर तो विदर्भाच्या आरोग्य इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

गामा नाईफ रेडिओसर्जरी म्हणजे काय?

– मेंदूवरील शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी अत्याधुनिक उपचारपद्धती. – शेकडो अतिसूक्ष्म गॅमा किरणांचा अचूक वापर करून आजारग्रस्त भागावर उपचार. – त्वचेवर चीरा न देता किंवा अनेक प्रकरणांत भूल न देता उपचार शक्य – उपचारादरम्यान निरोगी ऊतींचे नुकसान अत्यल्प.

कोणत्या आजारांवर उपयोग?

✔️ मेंदूतील ट्युमर (Brain Tumor)

✔️ आर्टेरिओव्हेनस मॉलफॉर्मेशन (AVM)

✔️ ट्रायजेमिनल न्युराल्जिया (चेहऱ्याच्या तीव्र वेदना)

✔️ अ‍ॅकॉस्टिक न्युरोमा

✔️ काही प्रकारचे मेंदूतील कर्करोग

✔️ मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार

✔️ निवडक न्यूरोलॉजिकल विकार

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More