निविदेपूर्वीच विहिरींचा गाळ काढण्याचे काम सुरू ? हिंगणा नगरपंचायतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

– हिंगणा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात मोठा घोटाळा सुरू आहे का ? 

The Exposer
नागपूर : हिंगणा नगरपंचायतीने क्षेत्रातील विहिरींचा गाळ काढून सफाई करण्यासाठी दिनांक ३ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा मागविल्याची सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे. मात्र जन संघर्ष सामाजिक समितीचे दीपक नासरे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली असता तहसील कार्यालयाजवळील विहिरीचा गाळ १ जून रोजीच काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला आहे.
तसेच धनगडपुरा मंदिराजवळील विहिरीवरही मजूर गाळ सफाईसाठी आवश्यक साहित्य घेऊन तयार असल्याचे आढळून आले. याबाबत पाणीपुरवठा अभियंता मनीष राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, “असे कोणतेही काम सुरू होणार असल्याची माहिती नाही, आज दुपारी ३ वाजता निविदा निघणार आहेत,” असे त्यांनी सांगितल्याचे नासरे यांनी म्हटले आहे.
यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कामाला सुरुवात कोणी केली ? कोणाच्या आदेशावर गाळ काढण्यात आला ? निविदा काढण्यापूर्वीच ठेकेदार निश्चित झाला होता का ? अशा अनेक गंभीर प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे जन संघर्ष सामाजिक समितीकडे असल्याचा दावा करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याच्या निविदा मागविण्यात आल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा आहॆ.

होय, आज गाळ काढण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या – मनिष राठोड, पाणी पुरवठा अभियंता 

होय, आज गाळ काढण्यासाठी आज निविदा मागविण्यात आल्या आहेत. नगरसेवकांनी मजूर लावून काही विहिरीचा गाळ स्वच्छ केल्या असतील तर त्याचा हिंगना नगर पंचायतशी काही संबंध नाही. आजच नगरसेवकाने एका विहिरीवर गाळ काढण्यासाठी मजूर लावल्याचे दिसून आले. आम्ही तेथे जाऊन ते काम थांबविले. मात्र, मी या नगर पंचायतमध्ये नव्याने बदलीवर आलो असल्याने त्या नगरसेवकांचे नाव मला माहिती नाही. तर आज गाळ काढण्यासाठी ज्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्या विहिरींची संख्या व पत्याविषयी माहिती विचारली असता मला माहित नाही. आम्ही निविदा काढतेवेळी विहिरीचा उल्लेख करीत नसतो तर केवळ गाळ काढण्यासाठी निविदा मागवीत असतो. गाळ काढल्यानंतर निविदा मागविण्यात आल्याचा आरोप साफ खोटा आहॆ. अशी प्रतिक्रिया वजा खुलासा हिंगना नगरपंचायतचे पाणी पुरवठा अभियंता मनिष राठोड यांनी ‘The Exposer’ न्यूज पोर्टलशी बोलतांना दिली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More