कळमना पोलिसांकडून केवळ १२ तासांत घरफोडीचा पर्दाफास

– मैत्रिणीसाठी घेणार होता आयफोन, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : कळमना पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत एका आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल जयंंत ब्रह्मा (रा. यशोदा अपार्टमेंट, वांजरा परिसर, नागपूर) यांच्या गोदामात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून विविध प्रकारचे टॉयलेट फिटिंग्ज व सॅनिटरी साहित्य चोरी केले होते. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त अनुपूर्णा सिंह मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गुप्त माहितीचे संकलन आणि सापळा रचून पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान पोलिसांनी चोरीतील AQUILO कंपनीचे विविध डिझाईनचे १६ नळ जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत आरोपींनी आपल्या मैत्रिणीसाठी महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणात इरफान अली ऊर्फ इन्नू रमजान अली (वय २८) याला अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग उघड झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त अनुपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) करिम खॉ पठान व त्यांच्या पथकातील तपास पथक प्रमुख पोउपनि संतोषकुमार रामलोड, तपास पथक कर्मचारी पो. हवा. रविकुमार शाहु, पो. हवा. प्रदिप पवार, पो. अं. मंगेश लोही, पो.अं. संतोष पांडे, पो.अं. अनिल जाधव, पो.अं. प्रफुल गोहोकार यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More