– सामाजिक कार्यकर्ते दिलीप मडावी यांचे आवाहन
The Exposer
नागपूर : आगामी जणगणना-2027 च्या पार्श्वभूमीवर गोंड समाजातील नागरिकांनी आपल्या समाजाची ओळख, मातृभाषा, संस्कृती आणि धर्म यांची अचूक माहिती जनगणना अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिलीप मडावी यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या जनजागृती पत्रकाद्वारे गोंड समाजातील नागरिकांना जनगणना प्रक्रियेत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकात गोंड समाजाची भाषा गोंडी, संस्कृती गोंडी आणि धर्म गोंडी असल्याचे नमूद करण्यात आले असून, जाती प्रवर्गात अनुसूचित जमाती (एस टी) अशी माहिती नागरिकांनी जनगणना नोंदवहीत योग्यरीत्या नोंदवून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
दिलीप मडावी यांनी सांगितले की, समाजाची खरी ओळख, भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांची अधिकृत नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे. जनगणनेतील अचूक आकडेवारीच्या आधारे शासन स्तरावर विविध योजना, धोरणे आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांना दिशा मिळण्यास मदत होते.
पत्रकात जनगणना अधिकारी घरी आल्यावर त्यांना आवश्यक माहिती आदरपूर्वक व अचूकपणे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनजाती, मातृभाषा, धर्म आणि संस्कृती यांची नोंद काळजीपूर्वक करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
गोंड समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि सामाजिक संघटनांनीही या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन समाजबांधवांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. “गोंड म्हणजे आपली ओळख, गोंडी म्हणजे आपली भाषा, संस्कृती आणि धर्म” हा संदेश देत जणगणना-2027 मध्ये समाजाची अचूक माहिती नोंदविण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











