– बनावट दस्तऐवज, फसवणूक आणि धमक्यांचे आरोप; BNS च्या विविध कलमांखाली कारवाई
The Exposer
नागपूर : मंदिराचे बांधकाम करून खासगी भूखंडावर बेकायदेशीर कब्जा केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी ज्वाला धोटे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी रोहन दीपक संकुलवार यांनी 2025 मध्ये गिट्टीखदान परिसरातील संबंधित भूखंडाची कायदेशीर खरेदी केली होती. मात्र, त्यानंतर काही व्यक्तींनी संगनमत करून भूखंडावर मंदिराचे बांधकाम केले, कंपाऊंड उभारले आणि जागेवर अतिक्रमण करून कब्जा केला. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क दाखवण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सिटी सर्व्हे विभागाकडून करण्यात आलेल्या मोजणीदरम्यान अतिक्रमणाचा प्रकार उघडकीस आला. यावेळी शासकीय कामात अडथळा आणणे, फिर्यादीला धमकावणे आणि भूखंडावरील ताबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढेच नव्हे गुप्ताच्या स्वतःच्या घराच्या पत्त्यावर धार्मिक स्वरूपाची संस्था सह धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आली आणि या संस्थेचे नाव पुढे करून शेजरील फिर्यादीच्या मालकीच्या प्लॉटवर मंदिराचे बांधकाम करून अतिक्रमन केले. अशा प्रकारे मंदिराच्या आड भूखंडावर कब्जा केला होता. यासाठी धोटे यांनी गुप्ताची साथ दिल्याचा आरोप आहॆ. एकेकाळी गुप्ताच्या धार्मिक संस्थेच्या कार्यकारणीवर चिंतामन पहेलवान यांचेही नाव होते. मात्र, त्यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटल्या जाते. आणि त्यांच्या पच्छात गुप्ताने इतरांच्या संगणमताने मंदिराच्या आड बांधकाम करून शेजारील फिर्यादीच्या भूखंडावर कब्जा केल्याचा आरोप आहॆ.
या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 189(2), 329(3), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांमध्ये फसवणूक, मालमत्तेशी संबंधित गैरव्यवहार, शांततेचा भंग व धमकी यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तक्रारीत ज्वाला धोटे, वर्षा गुमा, लक्ष्मण पाटील, सुरेंद्र तायवाडे आणि प्रतीक तायवाडे यांची नावे नमूद करण्यात आली असून, या सर्वांनी संगनमत करून भूखंडावर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे.धार्मिक स्थळाच्या नावाखाली खासगी मालमत्तेवर कब्जा केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गिट्टीखदान पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











