– वाडी पोलिसांची मोठी कारवाई, गुप्त माहितीच्या आधारे छापा; दोन आरोपी ताब्यात
The Exposer
नागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या मोठ्या साठ्यावर वाडी पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 8 लाख 68 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीमध्ये योगेश भीमराव दबरासे (वय 37 वर्षे) रा. पंचशील चौक, नवनीत नगर, पोलीस ठाणे वाडी, नागपूर, समीर सुरेश काकडे (वय 21 वर्षे) रा. भारत अपार्टमेंटच्या मागे, पोलीस ठाणे वाडी, नागपूर यांचा समावेश आहॆ.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाडी परिसरात सापळा रचून तपासणी करण्यात आली. यावेळी एमएच-40-एके-1147 क्रमांकाच्या लाल रंगाच्या थ्री-व्हिलर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 16 पांढऱ्या बोर्यांमध्ये विविध ब्रँडचे एकूण 798 HTBT बियाण्यांचे पॅकेट आढळून आले. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची अंदाजे किंमत 7 लाख 18 हजार 998 रुपये असून वाहना सहित एकूण 8 लाख 68 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्राथमिक तपासात संबंधित HTBT बियाणे बेकायदेशीररीत्या साठवून विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अशा प्रकारची बियाण्यांची विक्री केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वाडी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त बियाण्यांचा स्रोत, पुरवठादार आणि या अवैध नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. अवैध HTBT बियाण्यांच्या व्यापारावर पोलिसांचा दणका बसला असून या कारवाईमुळे बेकायदेशीर बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











