संघटित पशुतस्करी रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार

– चार आरोपी मकोकाखाली जेरबंद, गोवंश तस्करांना नागपूर पोलिसांचा स्पष्ट संदेश

The Exposer
नागपूर : शहरातील अवैध गोवंश तस्करी आणि पशुक्रूरतेविरोधात नागपूर पोलिसांनी ऐतिहासिक आणि धडक कारवाई करत प्रथमच एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करीच्या अवैध रॅकेटमध्ये खळबळ उडाली असून, चार आरोपींना मकोकाखाली अटक करण्यात आली आहे.
मकोकाखाली कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद वकील कुरेशी (52), अब्दुल नवाब कुरेशी (48), शेख चांद मोहम्मद (46) आणि जावेद कुरेशी (30) यांचा समावेश आहे. या आरोपींविरोधात गोवंश तस्करी, पशुक्रूरता, अवैध वाहतूक आणि गोवंश वधाशी संबंधित अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.

गुप्त माहितीवरून उघडकीस आले तस्करीचे जाळे

१८ मे २०२६ रोजी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर मोमिनपुरा परिसरात गस्तीदरम्यान तहसील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्सारनगर येथील नूरानी ग्राऊंडवर छापा टाकण्यात आला. या धाडीत तब्बल २९ गोवंशांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या तपासात या जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना चारा-पाणीही देण्यात आले नव्हते. कत्तलीसाठी त्यांची तयारी सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व गोवंशांना सुरक्षितपणे गोशाळेत हलविण्यात आले.

२०२० पासून सक्रिय; आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी

तपासादरम्यान संबंधित आरोपी २०२० पासून संघटित स्वरूपात गोवंश तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पुरावे समोर आल्यानंतर तहसील पोलिसांनी मकोका लावण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मुंडे यांनी तयार केलेला प्रस्ताव पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यामार्फत वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला होता. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त विनीता साहू यांनी मंजुरी दिल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.

मकोका लागल्याने आरोपींच्या अडचणी वाढल्या

मकोका लागू झाल्यामुळे आरोपींना सहज जामीन मिळणे कठीण झाले आहे. या कायद्यांतर्गत पोलिसांना विस्तारित कोठडीची तरतूद असून दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, संघटित पशुतस्करी, गोवंश तस्करी आणि पशुक्रूरतेमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अनिता मोरे करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More