– एफडी परताव्यासाठी ठेवीदाराची जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार
– पाच महिने उलटूनही रक्कम न मिळाल्याने वाढला उफाळला प्रचंड रोष
The Exposer
नागपूर : मेडिकल को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आर्थिक व्यवहारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका महिला ठेवीदाराने सोसायटीत मुदत ठेव (FD) परिपक्व होऊनही रक्कम परत मिळत नसल्याची तक्रार सहकार विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे, “मला वाटेल तेव्हा पैसे देईन” अशा शब्दांत सोसायटीच्या अध्यक्षांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा गंभीर आरोप संबंधित महिला ठेवीदाराने 29 एप्रिल 2026 रोजी सहकार विभागाकडे तक्रारीद्वारे केला आहे.
ही बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहॆ. तक्रारीनुसार, मेडिकल को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवलेली एफडी 15 डिसेंबर 2025 रोजी परिपक्व झाली होती. मात्र मुदत संपून जवळपास पाच महिने उलटूनही त्यांना त्यांच्या ठेवीची रक्कम मिळालेली नाही. यासंदर्भात त्यांनी अनेकदा सोसायटीच्या कार्यालयात संपर्क साधला, परंतु कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे.
ठेवीदाराच्या म्हणण्यानुसार, फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कॉल उचलला जात नाही. तसेच अध्यक्षांशी चर्चा केल्यावरही स्पष्ट उत्तर मिळत नसून “पैसे द्यायचे आहेत, पण मला वाटेल तेव्हा देईन” अशा स्वरूपाची प्रतिक्रिया मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिपक्व झालेल्या ठेवींचा परतावा तातडीने मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित ठेवीदाराने सहकार विभागाकडे लेखी तक्रार सादर करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मेडिकल सोसायटीतील ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, सहकार विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही तर इतर ठेवीदारही एकत्र येत पोलिस तक्रारीसह आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची उलट सुलट चर्चा आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











