– 2.20 लाखांचा मुद्देमाल जप्त; सराईत आरोपी जेरबंद
The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने उत्कृष्ट तपासकौशल्य आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त गोपनीय माहिती, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे वाहन चोरी विरोधी पथकाने निलेश उर्फ निलू राजेंद्र सोनावने (वय 25 वर्षे) यास ताब्यात घेतले. आरोपी हा सध्या विशाल मेंढे यांच्या घरी भाड्याने राहत असून त्याचा पत्ता लक्ष्मी नगर, गोधनी रोड, मानकापूर, नागपूर असा आहे.
चौकशीदरम्यान आरोपीकडून पोलिस ठाणे मानकापूर येथील अप. क्र. 234/2026, कलम 303(2) भा.न्या.सं. तसेच पोलिस ठाणे सीताबर्डी येथील अप. क्र. 331/2026, कलम 303(2) भा.न्या.सं. मधील चोरीस गेलेली वाहने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालात बजाज ऑटो मॅक्सिमा (MH-49-AR-6606) किंमत अंदाजे ₹1,50,000, होंडा शाईन दुचाकी (MH-40-BR-8715) किंमत अंदाजे ₹70,000
असा एकूण ₹2,20,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस ठाणे मानकापूरचे रात्रपाळी अधिकारी पीएसआय अजय जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाहन चोरी विरोधी पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांच्या चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाहन चोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा नागपूर शहर यांच्या या यशस्वी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











