कळमणा पोलिसांची धडक कारवाई : ४ किलो १६८ ग्रॅम गांजासह दोन तस्कर जेरबंद

– मध्यप्रदेश-ओडिशा कनेक्शन उघड; दुचाकी, बॅगसह १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या ‘अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान’ अंतर्गत कळमणा पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातील दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. आरोपींकडून ४ किलो १६८ ग्रॅम गांजा, एक दुचाकी आणि कॉलेज बॅग असा एकूण १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास कळमणा मार्केट, चिखली परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या दोन इसमांवर पोलिसांची नजर गेली. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातील बॅगेची तपासणी केली असता त्यामधून ४ किलो १६८ ग्रॅम गांजा आढळून आला.

या प्रकरणी सोम महेश बेडिया उर्फ कालकोर (वय २९) व असीम खान वल्द जमील खान (वय ३४) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ८० हजार रुपयांचा गांजा, ५० हजार रुपयांची होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि ५०० रुपयांची बॅग जप्त करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी क्रमांक २ हा ओडिशातून कमी दरात गांजा खरेदी करून आणत असल्याचे, तर आरोपी क्रमांक १ नागपुरातील ग्राहक शोधून त्यांना गांजा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडे गांजा नेमका कोणी पुरविला आणि तो कोणाला विक्रीसाठी आणला होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी कळमणा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राजूत करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा (भापोसे), सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पोनि (गुन्हे) करीम पठाण, पोउनि गजानन राऊत, पोहवा प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालबंशी व अजय गटलेवार यांनी पार पाडली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More