ICICI बँकेत 23 कोटींचा गोल्ड लोन महाघोटाळा उघड!

– 9 शाखांत बनावट सोन्यावर कोट्यवधींची कर्जे; 159 खातेदारांसह मूल्यांकनकर्त्यांचा सहभाग
– अनेक आरोपी अद्याप फरार; पोलिसांनी आवळला फास, मात्र तपासाची गती संथ?

The Exposer
नागपूर : नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या गोल्ड लोन विभागातील तब्बल 23.19 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून, बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांची कर्जे लाटण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणाने संपूर्ण बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून, याप्रकरणी धंतोली पोलिसांनी फसवणूक, बनावटगिरी आणि कटकारस्थानाचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयसीआयसीआय बँकेच्या नागपूरमधील नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्जे मंजूर करून घेण्यात आली. बँकेच्या अंतर्गत ऑडिटदरम्यान हा मोठा गैरव्यवहार उघड झाला. तपासात अनेक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले दागिने खरे सोने नसून बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

धंतोली पोलिस ठाण्यात आयसीआयसीआय बँकेचे विभागीय कार्यालयातील अधिकारी धनंजय रमेश थिटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात 159 खातेधारकांनी मूल्यांकनकर्ते, ऑडिट प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती आणि इतरांच्या संगनमताने हा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या माध्यमातून बँकेची तब्बल 23,19,64,751 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 406, 409, 420, 468, 120(ब) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट सोन्यावर कर्ज मंजूर होत असताना बँकेतील काही कर्मचारी, अधिकारी किंवा मूल्यांकनकर्त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. मूल्यांकनकर्त्यांच्या मंजुरीशिवाय कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर होणे अशक्य मानले जात असल्याने तपासाची दिशा आता अंतर्गत संगनमताकडे वळली आहे.

दरम्यान, या घोटाळ्यातील अनेक संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली असली तरी तपासाची गती अपेक्षेइतकी वेगवान नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या आर्थिक घोटाळ्यामागील खरे सूत्रधार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी संशयित खातेधारक, मूल्यांकनकर्ते आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असून आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे. तर काही फरार खातेदार आरोपीच्या घरापर्यंत पोलिस पोहचली आहॆ. नागपूरातील बँकिंग क्षेत्रातील हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गोल्ड लोन घोटाळ्यांपैकी एक मानला जात असून, तपास पुढे सरकताच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी आतापर्यंत किती आरोपीना अटक, आणि किती आरोपी फरार आहेत, याबाबत पोलिसांकडून अधिकृत खुलासा होऊ शकला नाही.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More