ताडोबा रिसॉर्टच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा?; गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक

– आरोपी बापलेकविरुद्ध बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : ताडोबा येथील रिसॉर्टमध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी नागपूरातील ऋषीकेश वाचासुंदर आणि त्यांचे वडील सत्यजित वाचासुंदर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथील व्यापारी प्रकाश गोविंदलाल अग्रवाल (वय 66) यांची आरोपी पिता-पुत्राशी ओळख झाली होती. आरोपींनी ताडोबा येथील त्यांच्या रिसॉर्ट प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे सांगून अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला.

या विश्वासातून अग्रवाल यांनी 2017 ते 2018 या कालावधीत तब्बल 2 कोटी 51 लाख रुपये गुंतवणूक म्हणून दिल्याचा आरोप आहे. मात्र, गुंतवणुकीनंतर अपेक्षित परतावा मिळाला नाही. उलट आरोपींकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव अग्रवाल यांना झाली.

यानंतर त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता वाद निर्माण झाला. दबाव वाढल्यानंतर आरोपींनी सुमारे 1 कोटी 51 लाख रुपये परत केल्याचे सांगितले जात आहे. मात्र उर्वरित रक्कम परत करण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अनेक वर्षे त्यांच्या पैशांचा वापर केला असून मूळ रक्कम आणि व्याज मिळून सुमारे 2 कोटी रुपये अद्याप देणे बाकी आहेत. या तक्रारीच्या आधारे बजाज नगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More