NEET केंद्रावर अपर पोलिस आयुक्त विनिता साहू यांची अचानक पाहणी

– पेपरफुटीनंतर नागपुरात सुरक्षा व्यवस्थेवर कडक नजर

The Exposer
नागपूर : गेल्या वर्षीची NEET परीक्षा पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे देशभरात वादग्रस्त ठरली असताना, यंदाच्या परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरातील एका NEET परीक्षा केंद्राला अपर पोलिस आयुक्त विनिता साहू यांनी अकस्मात भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची सखोल पाहणी केली.

परीक्षा केंद्रावरील पोलिस बंदोबस्त, उमेदवारांच्या प्रवेश प्रक्रियेतील सुरक्षा उपाय, संशयास्पद हालचालींवर ठेवण्यात आलेली नजर तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी माहिती घेतली. केंद्र परिसरात तैनात पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी दक्ष राहण्याचे निर्देशही दिले.

NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला असून, यंदा देशभरातील परीक्षा केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. उमेदवारांची कडक तपासणी, सीसीटीव्ही देखरेख, ओळखपत्र पडताळणी आणि संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त अशी विविध खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.

अपर पोलिस आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे परीक्षा केंद्रावरील यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More