– तक्रारींनंतरही कारवाई शून्य, आगीशी खेळ की अधिकाऱ्यांचे अभय?
The Exposer
नागपूर : उत्तर नागपूरातील वांजरी ले-आऊट परिसरातील कथित अवैध BPCL पेट्रोल पंप प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या या ठिकाणी फायर विभागाची परवानगी, अधिकृत बांधकाम मंजुरी व आवश्यक कायदेशीर परवानग्या नसतानाही वीजजोडणी कशी मंजूर करण्यात आली? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
या संदर्भात विविध विभागांकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही महावितरणसह संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रत्यक्ष चौकशी किंवा कारवाई केलेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, सदर पेट्रोल पंपाच्या इमारतीस अधिकृत बांधकाम परवानगी नसतानाही आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्तता न करता वीजजोडणी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जर आवश्यक परवानग्यांशिवाय पेट्रोल पंप सुरू असेल, तर त्याला वीजजोडणी कोणी आणि कोणत्या आधारावर मंजूर केली? नागरिकांच्या जीवाशी संबंधित या गंभीर प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का? याकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











