– कायदा-सुव्यवस्था, संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे संकेत; नागपूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या
The Exposer
नागपूर : राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आज नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते अधिकृत पदभार स्वीकारला.
मुंबईसह राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर प्रभावी कामगिरी बजावलेले विश्वास नांगरे पाटील हे शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कठोर प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिस दल अधिक सक्षम आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरात वाढत्या सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करण्यावर त्यांचा भर राहणार असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. पोलिस दलातील समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि जनतेशी संवाद वाढविण्यावरही विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.
पदभार स्वीकारताना वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस मुख्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नागपूरकरांच्या अपेक्षा आता नव्या पोलिस आयुक्तांकडून अधिक वाढल्या असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतले जातील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











