– 24×7 कार्यपद्धती, जलद प्रतिसाद आणि माध्यमांशी समन्वयावर भर; माहिती कक्षाच्या कायापालटाचे संकेत
The Exposer
नागपूर : शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अनेक सकारात्मक संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पोलिस आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या पोलिस माहिती कक्षाच्या कार्यपद्धतीतही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत मर्यादित झालेल्या माहिती कक्षाच्या कामकाजाला पुन्हा गतिमान करण्याची तयारी सुरू आहे. एकेकाळी २४ तास कार्यरत असलेला माहिती कक्ष पत्रकार, नागरिक आणि विविध यंत्रणांना तात्काळ व अधिकृत माहिती उपलब्ध करून देत होता. मात्र, कालांतराने ही व्यवस्था संथ झाली आणि पूर्वीसारखा क्विक रिस्पॉन्स अनुभवायला मिळेनासा झाला.
यामुळे माहितीच्या देवाणघेवाणीत विलंब होणे, माध्यमांशी समन्वय कमी होणे आणि वेळेवर अधिकृत माहिती न मिळणे, अशा तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर माहिती कक्षाला पुन्हा सक्षम, आधुनिक आणि प्रतिसादक्षम बनविण्याची गरज निर्माण झाली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यशैलीचा विचार करता, माहिती कक्षावरील ‘डस्ट’ झटकून त्याला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी माहिती कक्षाची धुरा अनुभवी व सक्षम अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येऊ शकते, अशीही चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः पोलिस माहिती कक्षाला भेट देऊन तेथील कार्यपद्धती, मनुष्यबळ, उपलब्ध सुविधा आणि सध्याची परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी पत्रकार आणि विविध स्तरातून पुढे येत आहे. माहिती कक्षाच्या उभारणीसाठी आवश्यक त्या सुधारणा करून त्याला पुन्हा एकदा २४x७ कार्यक्षम, वेगवान आणि तंत्रज्ञानसज्ज स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जर हे बदल प्रत्यक्षात झाले, तर पोलिस प्रशासनाची माहिती देण्याची यंत्रणा अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक होईल. त्याचा थेट लाभ माध्यमांना, नागरिकांना आणि एकूणच पोलिस-जनता संवादाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











