महिलेला एमडी ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचा कथित डाव उधळला; गुन्हेशाखेच्या युनिट-02ची धडक कारवाई!

– सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य आले समोर; 8.9 ग्रॅम एमडीसह संशयित ताब्यात, ₹85 हजारांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक-02 ने वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यांतर्गत धडक कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे 8.9 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, मोबाईल फोन आणि मोपेड असा एकूण ₹85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिल कॉम्प्लेक्स, तवाक्कल ले-आऊट, काटोल बायपास रोड येथे छापा टाकण्यात आला. सुरुवातीला एका महिलेच्या दुचाकीच्या फुटरेस्टखाली एमडी ड्रग्जच्या पुड्या आढळून आल्या. मात्र, संबंधित महिलेने आक्षेप घेतल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

प्राथमिक तपासात, गोपाल झोडगे (वय 37, रा. म्हाळगी नगर, नागपूर) यानेच महिलेची दुचाकी उभी असताना तिच्या फुटरेस्टखाली एमडी ड्रग्जच्या पुड्या ठेवल्याचे आणि पोलिसांना खोटी माहिती देऊन तिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 22(ब) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 231, 233 व 241 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या कारवाईदरम्यान दोन पंचांसमक्ष आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल वाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या कारवाईमुळे एका महिलेला कथितपणे खोट्या एनडीपीएस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न वेळेत उघडकीस आल्याचे समोर आले असून, सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More