– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाची अवहेलना
– मनपातील सत्ताधाऱ्यांना फलक झळकवत सुनावले खडे बोल
The Exposer
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत आज बहुजन समाज पक्षाच्या मनपा पक्षनेत्या तथा प्रभाग क्र. ७ (क) च्या नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांनी बजेटविरोधात आक्रमक भूमिका घेत सभागृहाचा बहिष्कार टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकासह सामाजिक न्यायाच्या प्रतीक असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी निषेधाचे फलक झळकवत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र अनेक वर्षे उलटूनही स्मारकाची उभारणी न झाल्याने ही केवळ आर्थिक तरतूद नसून महापुरुषांच्या विचारांची आणि समाजाच्या भावनांची अवहेलना असल्याचा आरोप त्यांनी केला.
सभागृहात झळकविण्यात आलेल्या फलकांवर त्यांनी यशवंत स्टेडियम परिसरातील १९९१ पासून प्रलंबित असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, मेडिकल चौकातील २००२ पासून प्रलंबित राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक, तसेच महात्मा फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
यासोबतच सादर करण्यात आलेले मनपाचे अर्थसंकल्प हे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा श्रीमंत घटकांना लाभदायी असल्याचा आरोप करत त्यांनी मनपा प्रशासन व अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध नोंदविला.
२७ जून रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आज सभागृहात चर्चा सुरू असताना सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जयस्वाल यांनी निषेधाची भूमिका घेतली. बसपा ही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या भूमिकेत नसून स्वतंत्र आणि तटस्थ भूमिका घेणारा पक्ष असल्याचे सांगत त्यांनी सभागृहातून बहिष्कार टाकला.
जयस्वाल यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनपा अर्थसंकल्पीय चर्चेत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महापुरुषांच्या स्मारकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











