– वर्धा रोडवर न्यायालयाच्या आदेशांनाही हरताळ? वाहतूक पोलिस व मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
The Exposer
नागपूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या वर्धा रोडवर फुटपाथवरच अवैधरित्या वाहन पार्किंग होत असल्याने पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने फुटपाथ हे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव असल्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही या आदेशांकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
वर्धा रोडवरील अनेक ठिकाणी चारचाकी, दुचाकी तसेच अन्य वाहने सर्रास फुटपाथवर उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांसाठी असलेला मार्ग पूर्णपणे बंद होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलिस आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोरही अशा प्रकारचे अवैध पार्किंग सर्रास होत असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याने वाहनचालकांचे मनोबल वाढले आहे. परिणामी न्यायालयाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याशिवाय वर्धा रोडलगत असलेल्या अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांनी इमारतींच्या बांधकामावेळी संबंधित प्राधिकरणाकडून मंजूर नकाशामध्ये आवश्यक पार्किंगची जागा दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात त्या पार्किंगच्या जागांवर अवैध बांधकामे किंवा अतिक्रमण करून ती जागा व्यावसायिक वापरासाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांची वाहने इमारतीच्या आवारात न उभी राहता थेट फुटपाथ व रस्त्यावर पार्क केली जात असून वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
तसेच वर्धा रोडवर अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस नियमबाह्यरित्या तासन्तास रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याचेही निदर्शनास येत आहे. संबंधित नियमांनुसार अशा बसेसना सार्वजनिक रस्त्यावर कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ थांबा घेण्याची परवानगी नसतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बसेसमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, धंतोली परिसरातील हॉस्पिटल हबमध्ये वाहतूक पोलिसांचे टोईंग वाहन आणि व्हील-जॅमर पथक दिवसभर सक्रिय राहून दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना दिसते. मात्र वर्धा रोडवर फुटपाथवरील अवैध पार्किंग, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर त्याच तत्परतेने कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी, निवडक ठिकाणीच नव्हे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याप्रकरणी मंजूर बांधकाम नकाश्यांची तपासणी करून पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या इमारत मालकांना व व्यावसायिक प्रतिष्ठानांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच फुटपाथवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवून, अवैध पार्किंग करणारी वाहने आणि नियमबाह्यरित्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर नियमित दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस, नागपूर महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











