‘हॅमर्स कॅफे’वर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश!

– मालक, व्यवस्थापकासह तब्बल ३० ग्राहकांवर गुन्हा
– COTPA अंतर्गत पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई

The Exposer
नागपूर : शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत हॅमर्स कॅफे अँड रेस्टॉरंटवर मध्यरात्री धडक छापा टाकला. या कारवाईत कॅफेमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का सेवा सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कॅफेचे मालक धीरज गोयंचा, व्यवस्थापक रंजीत कोचे यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या तब्बल ३० ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचपावली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पूर्वी ‘फिरंगीश कॅफे’ या नावाने सुरू असलेले आणि सध्या ‘हॅमर्स कॅफे’ या नावाने चालविले जाणारे हे आस्थापन पोलिसांच्या रडारवर होते.

छाप्यादरम्यान कॅफेमध्ये ग्राहकांना बेकायदेशीररीत्या हुक्का पुरविला जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मालक, व्यवस्थापक तसेच त्या वेळी उपस्थित असलेल्या ३० ग्राहकांविरुद्ध सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA) अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

या कारवाईमुळे शहरातील नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More