एमडी ड्रग्ज प्रकरणात नाव सांगितल्याचा संशय; हिस्ट्रीशीटरची ‘सात दिवसांत गोळी घालून ठार मारण्याची’ धमकी!

– पाचपावली पोलिसांनी दाखल केला एनसी अंतर्गत गुन्हा
– आरोपी मोकाट, पीडिताची कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आर्त हाक

The Exposer
नागपूर : एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना आपले नाव सांगितल्याच्या संशयातून एका हिस्ट्रीशीटरने तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच सात दिवसांच्या आत डोक्यात गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी असंज्ञेय गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहॆ.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर येथील रहिवासी अब्दुल करीम ऊर्फ लाला अजीज शेख (वय ४१) यांनी पाचपावली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ७ जुलै रोजी सायंकाळी ते हबीब नगर, टेका येथे त्यांचा मित्र शाहिद अख्तर अन्सारी याला भेटण्यासाठी गेले होते. याचदरम्यान अजहर अली याने आपल्या मोबाईलवरून त्यांचे फिरोज ऊर्फ हड्डी खान याच्याशी बोलणे करून दिले.

तक्रारीनुसार, फोनवर फिरोजने शिवीगाळ करत एमडी ड्रग्ज प्रकरणात आपले नाव पोलिसांना अब्दुल करीम यांनीच सांगितल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने सात दिवसांच्या आत डोक्यात गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावा पीडिताने केला आहे. एवढेच नव्हे, तर यापूर्वीही हत्येच्या उद्देशाने घराजवळ आल्याचे आणि हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचेही त्याने धमकीच्या स्वरात म्हटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडिताच्या तक्रारीनुसार, फिरोज ऊर्फ हड्डी खान हा २०२५ मध्ये वाठोडा पोलिस ठाण्यात दाखल सुमारे ११० ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आहे. तसेच त्याने पोलिस आणि एनडीपीएस अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचा दावाही केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर धमकीमुळे आपल्या तसेच कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत पीडिताने पोलिसांकडे सुरक्षा आणि आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, पाचपावली पोलिसांनी एनसी दाखल करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More