पदोन्नतीचा आनंद कुटुंबासोबत; नागपूर पोलिसांत प्रथमच अनोखा ‘पिपिंग सेरेमनी’ उपक्रम

– पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा अभिनव पुढाकार; पदोन्नत अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कुटुंबीयांनी लावल्या फिती

The Exposer
नागपूर : पोलीस दलात अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावल्यानंतर मिळणारी पदोन्नती ही प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो. या आनंदात त्यांच्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घेण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून शहर पोलीस दलात प्रथमच अभिनव ‘पिपिंग सेरेमनी’ आयोजित करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना पदोन्नतीच्या फिती लावण्याचा मान देण्यात आला. पोलीस दलातील कर्तव्य, त्याग आणि यशामागे कुटुंबीयांचेही मोठे योगदान असते, या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

उत्तर परिक्षेत्राच्या अपर पोलीस आयुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्रमांक २ परिसरातील उत्तर परिक्षेत्र कार्यालयात पदोन्नत सहायक पोलीस उपनिरीक्षकांसाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पदोन्नती मिळालेल्या ११ सहायक पोलीस उपनिरीक्षकांनी (ASI) आपल्या कुटुंबीयांसह सहभाग घेतला.

अपर पोलीस आयुक्त विनिता साहू तसेच पदोन्नत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या खांद्यावर पदोन्नतीच्या फिती लावल्या. यानंतर पदोन्नती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कुटुंबीयांच्या हस्ते खांद्यावर फिती लागल्याने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण भावनिक, संस्मरणीय आणि अभिमानाचा ठरला.

पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावत असतात. सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम आणि अनेक महत्त्वाच्या प्रसंगीही त्यांना कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळणारा पाठिंबा महत्त्वाचा असतो. त्यामुळे पदोन्नतीच्या आनंदात कुटुंबीयांना सहभागी करून त्यांच्याही योगदानाचा सन्मान करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पोलीस आयुक्त कार्यालयासह नागपूर शहरातील सर्व परिक्षेत्र कार्यालये आणि पोलीस उपायुक्त कार्यालयांमध्ये पदोन्नत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या ‘पिपिंग सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. नागपूर पोलीस दलात सुरू झालेल्या या अभिनव आणि कुटुंबकेंद्री उपक्रमामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासोबतच पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील भावनिक नाते अधिक दृढ होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More