नागपुरात अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारणार – पालकमंत्री बावनकुळे

– २२ जुलैला प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या अध्यक्षतेखाली जागा निश्चितीसाठी बैठक
– सरकारी वकीलांच्या सुविधांना लवकरच मिळणार नवे बळ

The Exposer
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाचे अद्ययावत सोयी-सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर मुनघाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य पारिजात पांडे, अतिरिक्त संचालक सरिता ताराम, सहाय्यक संचालक मैथिली काळवीट, एड. उदय डबले, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष एड. प्रकाश जयस्वाल, सचिव एड. अनिल गुल्हाने यांच्यासह न्यायव्यवस्थेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात माजी जिल्हा सरकारी वकील दिवंगत घोरपडे, डोंगरे आणि खुबाळकर यांना मरणोत्तर गौरविण्यात आले. तसेच प्रशांत सत्यनाथन, दत्ता दुबे, आसिफ कुरेशी, विजय कोल्हे आणि रवींद्र भोयर यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपुरात सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज भव्य नवीन जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभारण्याची घोषणा केली. यासाठी २२ जुलै रोजी प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जागा निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ही इमारत नागपूरच्या न्यायव्यवस्थेला नवी दिशा देण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातही भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी न्यायदान प्रक्रियेत सरकारी वकीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक सरकारी वकील मदन सेनाड यांनी केले, तर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More