दीक्षाभूमीतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वाद; प्राचार्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद

– प्राचार्य पदासाठी पेटला सत्ता संघर्ष, माया उके यांना कुणी केले हायर?

The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात घडलेल्या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांनी संबंधित व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NCR) अहवाल नोंदविला असून, शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाणीची धमकी आणि महाविद्यालयातील सुरक्षेतील त्रुटींबाबत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, संबंधितांविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

पोलीसांकडे नोंदविलेल्या अहवालानुसार, डॉ. भुवनेश्वरी मेहरे (वय 59) या 1989 पासून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असून, सन 2022 पासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 7 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता महाविद्यालयाच्या परिसरात तसेच समिती कक्षात माया उके या महिला व त्यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्तींनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रवेश केला.

तक्रारीनुसार, संबंधितांनी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या संपूर्ण प्रकारात रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दीपा यश पान्हेकर यांनी माया उके यांना सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्राचार्या डॉ. मेहरे यांनी तक्रारीत असा आरोप केला आहे की, वादादरम्यान डॉ. दीपा पान्हेकर यांनी त्यांचा उजवा हात मुरगळून धक्काबुक्की केली तसेच, “मीच प्राचार्य आहे, तू बाहेर निघ; नाहीतर तुला मारहाण करून बाहेर काढू,” अशी धमकी दिली.

याच घटनेदरम्यान महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्चना मेश्राम यांनाही माया उके यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि समिती कक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

प्राचार्यांनी आपल्या तक्रारीत महाविद्यालयाच्या सुरक्षा कंत्राटदार सिद्धार्थ महेस्कर यांच्यावरही गंभीर आरोप केले असून, संपूर्ण घटनेत त्यांच्या भूमिकेमुळे सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्याचा दावा केला आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, या घटनेत दुखापत झाल्यानंतर त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले, मात्र तेथे जवळचे नातेवाईक डॉक्टर असल्यामुळे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले नाही. तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

डॉ. मेहरे यांनी पोलीसांकडे दिलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, भविष्यात स्वतःला, महाविद्यालयातील प्राध्यापकांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही शारीरिक इजा अथवा जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माया उके, डॉ. दीपा यश पान्हेकर आणि सुरक्षा कंत्राटदार सिद्धार्थ महेस्कर यांच्यावर राहील.

या प्रकरणी संबंधित तिघांविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांनी पोलीसांकडे केली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीची नोंद एनसी म्हणून घेली घेतली आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More