ओयो हॉटेलमध्ये मुक्काम… अन् शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ; अट्टल ‘एक्का’ अद्याप फरार

– एमडीच्या व्यसनासाठी फोडायचा घरांचे कुलूप;  सराफासह दोघांवर गुन्हे दाखल 

– गुन्हे शाखेच्या युनिट-१ची धडक कारवाई; २.५० लाखांचे सोने जप्त, दोन घरफोड्यांचा उलगडा

The Exposer
नागपूर : राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखेच्या युनिट-१ने मोठी कारवाई करत दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तपासादरम्यान चोरीचे दागिने खरेदी करून वितळवणाऱ्या उमरेडमधील सराफापर्यंत पोलिसांनी धडक मारत २३ ग्रॅम १० मिलिग्रॅम वितळलेले सोने, सुमारे २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात चोरीचा माल विकणारा अर्जुन प्रभू सोलंकी याला अटक करण्यात आली असून चोरीचा माल खरेदी करून वितळवणाऱ्या सराफालाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र, घरफोड्यांचा मुख्य सूत्रधार हर्ष उर्फ ‘एक्का’ महेंद्र रामटेके रा. तिरोडा, गोंदिया हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलिसांनी अर्जुन प्रभू सोलंकी (२५, आराधना नगर, भांडेवाडी, नागपूर) याला अटक केली आहे. तर संदीप भास्कर गुंफलवार (३८, मंगलवारी पेठ, उमरेड) या सराफा व्यावसायिकाविरुद्ध चोरीचा माल खरेदी करून वितळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

पुण्यातील महिलेच्या तक्रारीतून उघडकीस आला गुन्हा

प्रीती मंगेश काटेकर (३९) या पुण्यात नोकरीस असून नागपूरच्या द्रोणाचार्य नगर येथील भाड्याच्या घरात राहत होत्या. २१ मे २०२६ च्या रात्री ते २२ मेच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्याने घरात घुसून सुमारे १२ ग्रॅम वजनाचे, ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुखबिराच्या माहितीवरून पोलिसांनी उघड केले रॅकेट

तपासादरम्यान गुन्हे शाखेचे हवालदार मनोज टेकाम यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून या चोरीमागे हर्ष उर्फ एक्का रामटेके असल्याचे स्पष्ट झाले. तो फरार असल्याने पोलिसांनी अर्जुन सोलंकीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने चोरीतील मंगळसूत्र उमरेड येथील आशीर्वाद ज्वेलर्सचे संचालक संदीप गुंफलवार यांना विकल्याची कबुली दिली. यावरुन सराफा गुंफलवार हाच चोरांचे रॅकेट चालवून त्यांना प्रोत्साहन देत असावा, असा संशय आहॆ. त्यामुळे लवकरच त्यालाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जातं आहॆ.

दुसऱ्या घरफोडीचाही झाला उलगडा

चौकशीत अर्जुनने २९ जून २०२६ रोजी खामला येथील सिंधी कॉलनीत झालेल्या आणखी एका घरफोडीची माहिती दिली. त्या घरफोडीत चोरी केलेले ५ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीचे दागिने देखील त्याने त्याच सराफाला विकल्याचे उघड झाले.

२.५० लाखांचे वितळलेले सोने जप्त

दोन्ही घरफोड्यांतील दागिने वितळवून तयार करण्यात आलेले २३ ग्रॅम १० मिलिग्रॅम सोने पोलिसांनी उमरेडच्या इतवारी पेठ मधील आशीर्वाद ज्वेलर्समधून जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे २.५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ओयो हॉटेलमध्ये मुक्काम… नंतर शहरात घरफोड्या

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील हर्ष उर्फ ‘एक्का’ रामटेके हा सराईत घरफोड्या आणि वाहनचोर आहे. एमडी अंमली पदार्थाच्या व्यसनासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने तो नागपुरात येऊन ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करत असे आणि त्यानंतर शहरातील विविध भागांत घरफोड्या व वाहनचोरीच्या घटना घडवत असे. त्याच्याविरुद्ध नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या अटकेनंतर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

या पथकाने केली धडक कारवाई

शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलिस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या नेतृत्वात हवालदार मनोज टेकाम, रवी अहिर, प्रीतम यादव, पोलीस शिपाई स्वप्नील खोडके, शरद चांभारे, अजमत शेख आणि नितीन बोपुलकर यांनी ही कारवाई केली. फरार आरोपीच्या एक्का रामटेकेच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके सक्रिय आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More