– नागपुरातील कोतवाली पोलिसांनी सुरु केला तपास
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर कथित खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता @cizhpuneet या X हँडलवरून “Thousands of students surrounded the RSS headquarters in Nagpur. Time to show RSS that are fake nationalists and are rogues.” असा मजकूर असलेली पोस्ट प्रसारित करण्यात आली होती.
या पोस्टची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर नागपूर येथील RSS मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. संबंधित पोस्टमधील माहिती खोटी, दिशाभूल करणारी व वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संवेदनशील ठिकाणाबाबत अशा प्रकारची खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे जनतेमध्ये भीती, संभ्रम व तणाव निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यातील खुपीया विभागात कार्यरत पोलीस हवालदार अनिल रामाजी बोद्रे (वय 48) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 165/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून X (Twitter) वरील @cizhpuneet या अकाउंटधारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2), 505 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











