MD तस्करीत कुख्यात गुंडांची एंट्री!; 43.74 लाखांचा मुद्देमाल जप्त

– ‘उडता नागपूर’ होण्यापासून शहराला वाचविण्यासाठी पोलिसांची आक्रमक मोहीम
– गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद, कुख्यात आरोपी फरार

The Exposer
नागपूर : नागपूर शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने भांडेवाडी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 151 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह 43 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याशी संबंधित एक कुख्यात गुंड अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी देवी नगर येथील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ संशयावरून दोन पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करून करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून 151 ग्रॅम एमडी पावडर (किंमत ₹30.20 लाख), दोन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि सुझुकी एक्सेस दुचाकी असा एकूण ₹43.74 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात मोहम्मद नियाज समसूल अन्सारी (वय 34) व मोहम्मद असलम समसूल अन्सारी (वय 34) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी एकाविरुद्ध यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, दुसऱ्यावर खुनाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणातील विशाल उर्फ फल्ली गुप्ता हा आरोपी फरार असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि आर्म्स ऍक्टसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी भांडेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 200/2026 अन्वये कलम 8(क), 22(क) व 29 एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भांडेवाडी पोलीस करीत आहेत.

अमली पदार्थांच्या साखळीवर आक्रमक प्रहार

शहरात एमडीसारख्या घातक अमली पदार्थांची वाढती तस्करी रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ‘उडता नागपूर’ होण्यापासून शहराला वाचविण्यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या अमली पदार्थांच्या साखळीवर आक्रमक प्रहार सुरूच ठेवला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More