– स्टेशन डायरी परिसरात छताचे PUP पॅनेल कोसळल्याने खळबळ; सुदैवाने टळली मोठी दुर्घटना
– जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; स्मार्ट पोलिस स्टेशन उभारण्याची नागरिकांची जोरदार मागणी
The Exposer
नागपूर : अजनी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्टेशन डायरी परिसरातील छताचे PUP (प्रीफॅब्रिकेटेड) पॅनेल अचानक कोसळल्याने काही काळ पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, ज्या टेबलवर पोलिस कर्मचारी नियमित बसून काम करतात, त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी त्यावेळी कामानिमित्त शेजारच्या खोलीत गेल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

घटना घडली त्या वेळी स्टेशन डायरीजवळ कोणताही तक्रारदार किंवा नागरिक उपस्थित नसल्यानेही मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा या घटनेचे स्वरूप अधिक गंभीर ठरले असते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, या घटनेनंतर इमारतीच्या इतर भागांतील PUP पॅनेल, छताची स्थिती आणि संपूर्ण संरचनेची तांत्रिक तपासणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. इमारतीत अशा प्रकारचे इतर धोके आहेत का, याची स्वतंत्र अभियांत्रिकी तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.

अजनी पोलिस ठाण्याची इमारत अनेक वर्षांपूर्वीची असून, येथील अनेक खोल्या आकाराने लहान आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मर्यादित जागेत काम करावे लागते. स्वच्छतागृहांच्या देखभालीबाबत तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतही स्थानिक स्तरावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, पोलिस ठाण्याच्या आवारात तुलनेने प्रशस्त मोकळी जागा उपलब्ध आहॆ. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक सुविधा, प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था, सुरक्षित संरचना, डिजिटल सुविधा आणि नागरिकाभिमुख सेवा असलेली स्मार्ट अजनी पोलिस स्टेशनची नवी इमारत उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
नवीन आणि सुसज्ज इमारतीमुळे शहरात आदर्श ठरलेल्या लकडगंज पोलिस ठाण्याचा दाखला देत, त्या प्रकल्पासाठी झालेल्या पाठपुराव्याप्रमाणेच अजनी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठीही शासन स्तरावर पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि गृह विभागाने सकारात्मक दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अजनी पोलिस ठाण्यातील PUP पॅनेल कोसळण्याची घटना सुदैवाने जीवितहानीविना पार पडली असली, तरी ती सार्वजनिक इमारतींच्या सुरक्षिततेविषयी गंभीर इशारा देणारी ठरली आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता संपूर्ण इमारतीचे संरचनात्मक सुरक्षा परीक्षण करून आवश्यक असल्यास नवीन, सुरक्षित आणि आधुनिक स्मार्ट पोलिस स्टेशन उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











