– एनडीपीएसमधील सराईत आरोपीचा शोध सुरू
– अमली पदार्थ विरोधी पथकाची मध्यरात्री धाड
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत १ किलो १४५ ग्रॅम गांज्यासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत गांजा आणि मोबाईलसह एकूण ४३,६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात आणखी एका सराईत आरोपीचा शोध सुरू आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ४ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे १२.३० दरम्यान चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक २, येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत शेख जुबेर शेख आबीद (वय २५, रा. चितार ओळी, महाल) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून १ किलो १४५ ग्रॅम गांजा (किंमत २८,६५० रुपये) आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४३,६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान या गुन्ह्यात शेख इम्तियाज शेख जब्बार (वय ६५) हा फरार असल्याचे समोर आले असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे तसेच तहसील पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या शेख जुबेरविरुद्धही यापूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार पवन गजभिये यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(२)(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलीस ठाण्यात सुरू असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











