अल्पवयीनेवरील अमानुष अत्याचार प्रकरणाला नवे वळण!

– ३ ऑगस्टचे विमान तिकीट बुक; OTT, सोशल मीडिया आणि डिजिटल पुरावे तपासाच्या केंद्रस्थानी

The Exposer
नागपूर : एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीच्या कथित अपहरण, ब्लॅकमेल आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपीने ३ ऑगस्ट रोजी विमान प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले होते, मात्र ते नंतर रद्द करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हे तिकीट कोणत्या उद्देशाने काढण्यात आले होते आणि ते का रद्द करण्यात आले, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

पोलिसांकडून आरोपीच्या डिजिटल हालचाली, सोशल मीडिया वापर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी स्वरूपाच्या सामग्रीशी त्याचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष काढण्यात आलेला नसून तपास पूर्णपणे वैज्ञानिक पुरावे आणि डिजिटल साक्षांवर आधारित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वेबसाईटवरून भाड्याने खोली बुक

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी सांगितले की, या प्रकरणात १९ वर्षीय निर्मय पाखरे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने खरबी परिसरातील भाड्याच्या खोलीत अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवत तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित खोलीची बुकिंग आरोपीने 99acres या वेबसाइटद्वारे केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपी सोशल मीडियाचा जाणकार असून त्याने पीडितेचे सोशल मीडिया खातेही हॅक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असून, आरोपी प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितेची प्रकृती स्थिर; खोलीतून धक्कादायक साहित्य जप्त

पोलिसांनी दरवाजा फोडून पीडितेची सुटका केली तेव्हा तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा आणि धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आढळल्या. सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

घटनास्थळावरून तीन धारदार चाकू, दोन ते तीन बेल्ट, झोपेच्या गोळ्या, लैंगिक क्षमता वाढविण्याची औषधे, काळी पट्टी, हातमोजे आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे सर्व साहित्य न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

वैज्ञानिक तपासावर पोलिसांचा भर

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असतानाही आरोपी चौकशीत अपेक्षित सहकार्य करत नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. त्याची पोलीस कोठडी ६ ऑगस्टपर्यंत असून, गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

घटनाक्रमातील सर्व दुवे जोडण्यासाठी आता पोलिसांनी फॉरेन्सिक अहवाल, डीएनए तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून डिलीट करण्यात आलेला डिजिटल डेटा पुनर्प्राप्त करण्यावर विशेष भर दिला आहे. या वैज्ञानिक अहवालांनंतरच प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतील, असा पोलिसांचा विश्वास आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More