डिजिटल KYCच्या जाळ्यात अडकवून मोबाईल हॅक; साडेसात लाखांवर डल्ला!

– ‘APK फाईल’ डाउनलोड करताच सायबर ठकबाजांचा मोबाईलवर ताबा; ICICI खात्यातून ₹७.४९ लाख परस्पर वळते

The Exposer
नागपूर : डिजिटल युगात सायबर ठकबाजांनी फसवणुकीचा नवा फंडा सुरू केला असून, ‘डिजिटल KYC अपडेट करा’ या आमिषातून एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मोबाईलच हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ४९ हजार रुपये परस्पर वळते केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. APK फाईल डाउनलोड करण्याची चूक महागात पडल्याने काही क्षणांतच खात्यातील लाखो रुपये गायब झाले.

रामनगर येथील राघवेंद्र रवी (६७) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात सायबर ठकबाजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राघवेंद्र रवी हे रामदासपेठेतील नीती गौरव कॉम्प्लेक्समधील इन्स्टिट्यूट ऑफ सर्जिकल पॅथॉलॉजीचे संचालक आहेत. ३० जुलै रोजी दुपारी ‘देव’ नावाच्या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. बँक खात्याचे KYC अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे सांगत आरोपीने डिजिटल KYCची प्रक्रिया करण्याचे आमिष दाखवले.

यानंतर आरोपीने राघवेंद्र यांना WhatsApp डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक APK फाईल पाठवून ती डाउनलोड करण्याच्या सूचना दिल्या. फाईलमध्ये आवश्यक माहिती भरण्यास सांगून आरोपीने त्यांना विश्वासात घेतले. राघवेंद्र यांनी आरोपीच्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण केली.

मात्र, हीच प्रक्रिया त्यांच्या चांगलीच अंगलट आली. APK फाईलच्या माध्यमातून सायबर ठकबाजांनी त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवल्याचा संशय आहे. त्यानंतर त्यांच्या ICICI बँक खात्यातून तब्बल ₹७,४९,००० परस्पर वळते करण्यात आले.

खात्यातून मोठी रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच राघवेंद्र यांनी तातडीने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच मोबाईलमधील तांत्रिक पुरावे, संबंधित व्यवहार आणि आरोपीने वापरलेल्या डिजिटल माध्यमांचा तपास सुरू आहे.

‘APK’ म्हणजे सायबर ठकबाजांचे नवे हत्यार?

KYC, बँक अपडेट, कुरिअर, वीजबिल किंवा सरकारी सेवा अशा विविध कारणांचा आधार घेत नागरिकांना APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले जात आहे. एकदा अशा संशयास्पद फाईलला परवानगी दिल्यास मोबाईलमधील संवेदनशील माहिती आणि आर्थिक व्यवहार धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने पाठविलेली APK फाईल डाउनलोड न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More