– पोलिस आयुक्तांचा दरारा; नंदनवन पोलिसांचा जुगार अड्ड्या’वर छापा
– कॅसिनो मशीनवर जुगार; ६ जणांवर गुन्हा, रोख रकमेसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : शहरात कॅसिनो मशीनच्या माध्यमातून जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर नंदनवन पोलिसांनी हसनबाग चौक परिसरातील कब्रस्तानजवळील लॉटरी वगेम पार्लर’वर छापा टाकून कॅसिनो मशीनद्वारे जुगार खेळविणाऱ्या सहा जणांविरुद्ध कारवाई केली.

पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना त्यांना संबंधित ठिकाणी मशीनद्वारे जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाईत सय्यद मोहम्मद मुसवीरुद्दीन सलामुद्दीन सय्यद काजी (२३), अब्दुल सलमान अब्दुल सलाम (३४), अब्दुल अजीम अब्दुल रहीम (३४), मोहम्मद अक्रम मोहम्मद बैतुल्ला (४५), काशिनाथ दादाजी येवले (४७) आणि मदन काशिनाथ बडगे (५६) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विविध कंपन्यांच्या कॅसिनो मशीनच्या माध्यमातून पैशांची बाजी लावून हार-जीतीचा जुगार खेळवत होते. कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम ३,२६० रुपये, दोन संगणक, सात कॅसिनो मशीन व इतर साहित्य असा एकूण सुमारे २ लाख २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपींनी दुकानमालक अभिषेक याच्या मदतीने कॅसिनो जुगार खेळविला जात असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या कारवाईने प्रश्न ऐरणीवर
कॅसिनो मशीनच्या नावाखाली शहरातील विविध भागांत अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरू आहेत का? ‘गेम पार्लर’, ‘लॉटरी सेंटर’ किंवा अन्य नावांच्या आड सुरू असलेल्या या कथित कॅसिनो क्लबवर आता पोलिसांची नजर जाणार का? असा सवाल या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस उपायुक्त रश्मिता राव, सहायक पोलिस आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने, सहाय्य्क पोलिस निरीक्षक उमाकांत राठोड, पोलिस उपनिरीक्षक संतोषकुमार राठोड, पोलिस अंमलदार प्रवीण मरापे, राहुल खळतकर यांनी केली.

Author: संतोष तायडे
संपादक










