आदिवासी समाजाचे प्रभावी नेतृत्व हरपले; दिनेश शेराम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, आदिवासी सेवक व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड; सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

The Exposer
नागपूर : आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश अंबादास शेराम यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने आदिवासी समाजासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दिनेश शेराम हे कुटुंबासह शास्त्री लेआऊट, सुभाषनगर, विवेका हॉस्पिटलजवळील ज्ञानयोगी अपार्टमेंट येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा एलएल.बी.चे शिक्षण घेत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर संघर्ष

दिनेश शेराम यांची ओळख केवळ राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर आदिवासी समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यासाठी सातत्याने आवाज उठविणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून होती. विदर्भातील आदिवासी समाजाच्या विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासोबतच त्यांनी आदिवासी विद्यार्थी, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला.

ते विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ महासचिव होते. तसेच नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, लक्ष्मीनगर या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक गरजू आणि गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.

वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मार्गदर्शन आणि विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले होते.

सामाजिक कार्याची शासनानेही घेतली दखल

दिनेश शेराम यांच्या सामाजिक कार्याची दखल राज्य शासनाने घेत त्यांना ‘आदिवासी सेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते. नागपूर विद्यापीठाकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट अधिसभापटू म्हणून गौरविण्यात आले आहे.

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आयोजित आंदोलने, उपोषणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. आदिवासी विकास विभागासमोरील प्रश्नांपासून ते शासनाच्या विविध स्तरांवरील मागण्यांपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

गोंडवाना संस्कृतीच्या जतनासाठीही योगदान

आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि वारशाशी संबंधित उपक्रमांमध्येही शेराम यांचा सहभाग राहिला. गोंडवाना संग्रहालय तसेच गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या राजघाटाच्या बांधकामासंदर्भातील कार्यातही त्यांचे योगदान असल्याचे सांगण्यात येते. विविध खासदार, आमदार, राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आदिवासी समाजाच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

अचानक निधनाने आदिवासी समाजाला मोठा धक्का

अत्यंत सक्रिय असलेल्या दिनेश शेराम यांच्या अचानक निधनाची बातमी समोर येताच आदिवासी समाजात शोककळा पसरली. एक सच्चा आदिवासी सेवक, अभ्यासू नेता आणि विद्यार्थ्यांसाठी झटणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची आठवण कायम राहील. त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाची मोठी हानी झाली आहे.

दिनेश अंबादास शेराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

– The Exposer

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More