रेल्वे रुळाजवळ युवकाचा मृतदेह; ‘कमलेश’ नावाच्या गोंदणाने गूढ वाढले!

– इमामवाड्यात खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान, हत्येच्या अफवेने परिसरात चर्चेला उधाण

The Exposer
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धंतोली रेल्वे पुलाजवळ पटरी जवळ एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताच्या उजव्या हातावर ‘कमलेश’ असे गोंदलेले असून त्याच्याजवळ ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र अथवा मोबाइल आढळला नाही. त्यामुळे मृताची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रश्मिता राव तसेच इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, युवकाचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळल्याने परिसरात त्याची हत्या झाल्याची अफवा पसरली आणि घटनेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, पोलिसांनी सध्या हत्या झाल्याच्या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही.

मृताच्या डोळ्याजवळ जखमेची खूण आढळून आली आहे. युवक नशेच्या अवस्थेत पडल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असावा आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

इमामवाडा पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, युवकाची ओळख पटविण्यासह घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. ‘कमलेश’ या गोंदणावरून मृताची ओळख पटविण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More