कुकरेजा इन्फिनिटीमध्ये 60 फुटांवरून कोसळला सफाई कामगार; सुरक्षेचा बोजवारा?

– कचरा साफ करताना पायाखालचा प्लाय तुटला; अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पडून लोकेश गंभीर जखमी

The Exposer
नागपूर : सिव्हिल लाईन्समधील मनपा मुख्यालयाजवळ असलेल्या कुकरेजा इन्फिनिटी इमारतीत सफाईचे काम करत असताना पायाखालचा प्लाय अचानक तुटल्याने एक खाजगी सफाई कामगार तब्बल अंदाजे 60 फूट खाली अंडरग्राउंड पार्किंगमध्ये कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेने इमारतीत एकच खळबळ उडाली असून जखमी कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकेश (अंदाजे 31) असे जखमी सफाई कामगाराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो विवाहित असून कुकरेजा इन्फिनिटीमध्ये साफसफाईचे काम करीत असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 12 ते 12.30 वाजताच्या सुमारास लोकेश इमारतीतील साफसफाईचे काम करीत होता. यावेळी तो एका खड्ड्यात उतरून सुपड्याने कचरा साफ करीत असताना त्याच्या पायाखाली असलेला प्लाय अचानक तुटला. त्यामुळे तो थेट अंदाजे 60 फूट खाली असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये कोसळला.

या भीषण पडझडीत लोकेशच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील कर्मचारी व अन्य व्यक्तींनी मदतीसाठी धाव घेतली. त्याला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, सफाई कामगार ज्या ठिकाणी उभा राहून काम करीत होता, तेथे सिमेंट-काँक्रीटच्या खड्ड्यावर प्लाय लावण्यात आले होते. हा प्लाय कामगाराचा भार सहन न करू शकल्याने तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? तसेच धोकादायक ठिकाणी प्लाय लावून कामगारांकडून काम करून घेण्यात आले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेनंतर लोकेशच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचीही उलटसुलट चर्चा होती. मात्र, मृत्यूबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने त्याची खात्रीशीर माहिती अधिकृत यंत्रणेकडून मिळणे आवश्यक आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमागे नेमका निष्काळजीपणा कोणाचा होता, कामगारांच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More