– सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांची आत्महत्या; आयुक्तालयातील अर्ज व प्रोटेक्शन शाखेत होते कार्यरत
The Exposer
नागपूर : शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर झोल असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. झोल हे पोलिस आयुक्तालयातील अर्ज व प्रोटेक्शन शाखेत कार्यरत होते. या घटनेमुळे नागपूर शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर झोल हे काही महिन्यांपूर्वीच नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. ते पोलिस वसाहतीतील शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहत होते. सध्या ते पोलिस आयुक्तालयातील अर्ज आणि प्रोटेक्शन शाखेची जबाबदारी सांभाळत होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या स्वभावात बदल जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. ते काहीसे तणावात असल्याचेही त्यांच्या परिचितांच्या निदर्शनास आले होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्वातंत्र्य दिनी दिवसभर कर्तव्य; रात्री घरी घेतला टोकाचा निर्णय
१५ ऑगस्ट रोजी झोल यांनी दिवसभर कर्तव्य बजावले. त्यानंतर रात्री ते घरी परतले. त्यांची पत्नी दोन्ही मुलांसह झोपली होती. जेवण केल्यानंतर झोल झोपले. मात्र, मध्यरात्रीनंतर त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. झोल यांना खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्पुरती आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.
आत्महत्येचे गूढ कायम; सुसाईड नोट सापडली नाही
जबाबदार पोलिस अधिकारी असलेल्या झोल यांनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते वैयक्तिक, कौटुंबिक अथवा अन्य कोणत्या कारणामुळे मानसिक तणावात होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्याने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जीवन संपवल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक















