राहुल गांधींचा जखमी साहिलच्या FIR साठी DCP कार्यालयाबाहेर ठिय्या!

– दिल्ली पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; पेलेट गनच्या गोळीने विद्यार्थ्याच्या डोळ्याला झाली होती गंभीर दुखापत

The Exposer
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर मंतरवरील cjp च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनचे छररे लागून डोळ्याला गंभीर दुखापत झालेल्या फिर्यादी साहिलच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी अद्याप FIR दाखल केलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. FIR दाखल करून न्याय मिळावा, या मागणीसाठी साहिल आणि त्याची आई सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या तक्रारीवर ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत साहिल आणि त्याच्या आईला सोबत घेऊन प्रथम कनॉट प्लेस पोलीस ठाणे गाठले. पोलिस अधिकाऱ्यांनी साहिलची फाइल DCP कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून तेथून उत्तराची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी साहिल आणि त्याच्या आईसह DCP कार्यालयात पोहोचले. मात्र, तेथेही FIR नोंदविण्याची प्रक्रिया पुढे न गेल्याने राहुल गांधी यांनी DCP कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले.

तक्रार स्वीकारली, मग FIR का नाही?

साहिलच्या तक्रारीवर अद्याप Daily Diary Number किंवा Acknowledgment Number देण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर AIIMSकडून साहिलची MLC (Medico-Legal Case) रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेली नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचा दावा असताना तक्रार औपचारिकपणे नोंदवून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यास एवढा विलंब का होत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांनी साहिलला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली आहे. साहिलच्या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आजच्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More