– दोन लाखांच्या कर्जाची परतफेड टाळण्यासाठी पोलिसांनाच दिली खोटी माहिती; मोबाईल लोकेशन अन् इलेक्ट्रॉनिक पुराव्यांनी उघड केला कट
The Exposer
नागपूर : दोन लाख रुपये परत करण्याची वेळ आली, मात्र हातात पैसे नसल्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच्या कारची चाकूच्या धाकावर लूट झाल्याचा बनाव रचणाऱ्या तरुणाचा हुडकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला. मोबाईल लोकेशन, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि चौकशीत समोर आलेल्या विसंगतींच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही वेळात या कथित लूटमारीमागचे सत्य बाहेर काढले.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी अमोल संतोष धर्नेजा (२८, रा. त्रिमूर्तीनगर, नागपूर) याने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिरॅमिड सिटी परिसरातून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. काही अंतर गेल्यानंतर त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि कार घेऊन पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कारमध्ये सुमारे २ लाख ५ हजार रुपये रोख असल्याचा दावाही त्याने केला.
यानंतर कार सोनेगाव-विमानतळ परिसरात आढळून आली. मात्र मोबाईल आणि इतर साहित्य कारमध्ये जसेच्या तसे असल्याचे समोर आले. या घटनेचा तपास सुरू करताच तक्रारदाराच्या कथनात पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या.
लोकेशनने उघड केला ‘लुटी’चा खेळ!
हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारदाराच्या मोबाईलचे लोकेशन, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि घटनेपूर्वीच्या त्याच्या हालचाली तपासल्या. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीमध्ये परस्परविरोधी बाबी आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर सखोल चौकशीत कथित लूटमारीचा संपूर्ण बनाव उघड झाला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमोल धर्नेजा याने त्रिमूर्तीनगर परिसरातील ‘बैठक कॅफे’ सुरू करण्यासाठी त्याचा मित्र अवतारसिंग महेन्द्रसिंग धुन्ना (४२, रा. आंबेडकर चौक, लकडगंज) याच्याकडून सुमारे २ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी राजेश चेलानी यांच्याकडून त्याच्यावर सातत्याने पैशांसाठी तगादा लावला जात होता.
२२ ऑगस्ट रोजी रक्कम परत करण्याची वेळ आली असताना पैसे नसल्याने, आपण घेतलेली रक्कम लूटमारीत गेल्याचा बनाव केल्यास पैसे परत करण्याची वेळ टाळता येईल, असा विचार करून कथित लूटमारीची खोटी कहाणी रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांची दिशाभूल महागात पडणार
आर्थिक जबाबदारी टाळण्यासाठी पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन लूटमारीचा बनाव करणाऱ्या या प्रकरणामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. मात्र हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवर केवळ विश्वास न ठेवता तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्ष चौकशीच्या आधारे सत्य शोधून काढले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे, API रामटेके, HC मुकेश किन्नाके आणि PC रिषभ ठाकरे यांच्या पथकाने केली.
पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (South Region) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
Author: संतोष तायडे
संपादक















