The Exposer
गडचिरोली : “रिपब्लिकन पार्टीचा खरा शत्रू पक्षाबाहेर नसून पक्षातील गटातटाच्या राजकारणात अडकलेले छोटे-मोठे नेतेच आहेत. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम केले, तर रिपब्लिकन पार्टीची ताकद निश्चितपणे वाढेल,” असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली येथील यमुना हॉलमध्ये जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून प्रकाश कुंभे बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम यांच्या हस्ते झाले.
गावागावात आंबेडकरी विचार पोहोचविण्याचा निर्धार
यावेळी रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पक्षाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या तीन संघटनांपैकी रिपब्लिकन पार्टी ही महत्त्वाची संघटना असून, पक्षाची विचारधारा गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून आलेल्या मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी जिल्ह्यात पक्षविस्ताराची ग्वाही दिली.
‘रिपब्लिकन पार्टी आजही सक्रिय’ — डॉ. अनिरुद्ध वनकर
मेळाव्याचे विशेष अतिथी गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी रिपब्लिकन पार्टीच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. रा.सु. गवई यांच्या काळात रिपब्लिकन पार्टीची ताकद मोठी होती. आजही पक्ष विविध भागांत सक्रिय असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी काँग्रेसची मित्रपक्ष म्हणून भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटन मजबूत करण्यावर भर
मेळाव्यात विविध वक्त्यांनी रिपब्लिकन पार्टीची विचारधारा, संघटन मजबूत करण्याची गरज, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आगामी काळातील पक्षविस्तार यावर मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचा वाढदिवस असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस गोपाल रायपुरे, महिला आघाडी प्रमुख ऍड. प्रियंका चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे, माहिती अधिकार अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, ऍड.. विनय बांबोळे, साहित्यिक डॉ. चंद्रशेखर बांबोळे, प्रदेश उपाध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे, प्राचार्य हेमंत रामटेके, बामसेफचे भोजराज कान्हेकर, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे, डॉ. चंद्रसुरेख डोंगरवार, राज्य सचिव अशोक उमरे, कोमल रामटेके, इंजि. विजय मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या सुशिला भगत, चंद्रपूर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुमनताई रामटेके, नागपूर प्रदेश उपाध्यक्ष लीनाताई जुनाघरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय विविध तालुक्यांतील पक्ष पदाधिकारी, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि चिमूर लोकसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक विजय शेंडे यांनी केले, तर आभार निशांत भासारकर यांनी मानले.
Author: संतोष तायडे
संपादक















