वाठोड्यात घरफोडी-वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश!

– तिघे संशयित ताब्यात; चांदीचे दागिने आणि चार मोटारसायकलींसह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : वाठोडा पोलिसांच्या तपास पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेत घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरींची कबुली दिल्याने तब्बल चार गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी मोहम्मद दानिश अली मोहम्मद अर्शद अली (२०), सय्यद सलमान सय्यद जलाल (२०) आणि मोहम्मद अर्शद ऊर्फ नाबालिक साजिद शेख (२०) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीचे चांदीचे दागिने तसेच चोरी केलेल्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये आहे.

या कारवाईत वाठोडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ४१६/२०२६, ४१८/२०२६, ४२०/२०२६ आणि ४२२/२०२६ हे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये BNS अंतर्गत घरफोडी व वाहनचोरीच्या कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत.

पेट्रोलिंगदरम्यान संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी तिघांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी केलेल्या चोरींची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

वाठोडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांवर लगाम बसण्याची शक्यता असून, आरोपींच्या आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More