बनावट गोल्ड लोनचा २३.३२ कोटींचा महाघोटाळा; फरार मुख्य आरोपी सचिन रौऊत अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

– ICICI बँकेला कोट्यवधींचा गंडा; मनीष नगर ते नंदनवनपर्यंतच्या शाखांमधील १५२ खात्यांची तपासणी
– फसवणुकीच्या रकमेतून महागडी सफारी कारसह बुलेट घेतल्याचा संशय

The Exposer
नागपूर : बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ICICI बँकेतून कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन उचलून तब्बल २३ कोटी ३२ लाख ६८ हजार ७५२ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या बहुचर्चित प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सचिन रौऊत याला अखेर पोलिसांनी अटक केल्याने आर्थिक गुन्हेशाखेच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

तपासात फसवणुकीच्या रकमेतून महागडी टाटा सफारी कार व बुलेट खरेदी केल्याची माहिती समोर आली असून, आता पोलिसांनी संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा ‘मनी ट्रेल’ तपासण्यास वेग दिला आहे. तसेच पत्नीच्या नावाने अथवा तिच्या कथित बनावट स्वाक्षरीचा वापर करून कर्ज उचलण्यात आल्याची चर्चा असून, या बाबीची अधिकृत तपासातून पडताळणी होणे बाकी आहे.

या प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून गोल्ड लोन मंजूर करणे, कर्जाची रक्कम विविध खात्यांमध्ये वळविणे आणि बँकेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कथित संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

ऑडिटमधून उघड झाला बनावट सोन्याचा खेळ

बँकेच्या गोल्ड लोन खात्यांचे नियमित ऑडिट सुरू असताना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका खात्यातील तारण सोन्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर संबंधित खात्यांसह विविध शाखांमधील गोल्ड लोन व्यवहारांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात ३० मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला.

मनीष नगर ते नंदनवन; १५२ गोल्ड लोन खात्यांची छाननी

तपासादरम्यान मनीष नगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन येथील ICICI बँकेच्या संबंधित शाखांमधील गोल्ड लोन व्यवहार तपासण्यात आले. एकाच संशयित खात्यापासून सुरू झालेला तपास तब्बल १५२ गोल्ड लोन खात्यांपर्यंत पोहोचला आहे.

प्रत्येक खात्यामागे कर्ज कोणाच्या नावाने मंजूर झाले, तारण म्हणून काय दाखविण्यात आले, कर्जाची रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली आणि त्यानंतर ती रक्कम कुठे वळविण्यात आली, याचा स्वतंत्रपणे मागोवा घेण्यात येत आहे.

तपासात अ‍ॅप्रेजर/व्हॅल्युअर नंदू खरवडे याने १५५ बनावट सोन्याच्या दागिन्यांचे व्हॅल्युएशन केल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे. त्याने ओळखीचे, मित्र आणि नातेवाईक अशा ३८ संशयित ग्राहकांना गोल्ड लोन मिळवून दिल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे.

आठ आरोपी अटकेत; मात्र पारदर्शकतेबाबत प्रश्न

या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी सचिन रौऊतच्या अटकेनंतर तपासातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची संपूर्ण नावे, त्यांची नेमकी भूमिका आणि प्रत्येकाविरुद्ध कोणते पुरावे उपलब्ध आहेत, याबाबत स्पष्ट माहिती समोर येण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तसेच, अटक आरोपींपैकी किती जणांना जामीन मंजूर झाला, किती जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आणि  जर काहींना जामीन मंजूर झाला असेल तर जमीन मंजूर होण्यामागील न्यायालयीन आधार काय होता, याचाही खुलासा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सफारी कारसह मालमत्तांच्या कर्ज प्रकरणाचा तपास

सचिन रौऊतच्या अटकेनंतर पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेतून खरेदी करण्यात आलेल्या सफारी कारसह मालमत्ता, वाहने आणि इतर महागड्या वस्तूंच्या कर्ज प्रकरणाची चौकशी तीव्र केल्याची माहिती आहे. बँक व्यवहार, व्हॅल्युएशन अहवाल, ऑडिट रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या आधारे संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. तसेच आजवर कोणत्या कोणत्या मालमत्तासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आणि त्याचा कायदेशीर आधार काय? याबाबतही प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांसाठी हा तपास आव्हान ठरल्याचे बोलले जात आहॆ.

त्यामुळे याप्रकरणातील यापूर्वी अटकेतील सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत की काही जण जामिनावर बाहेर आहेत, प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती आणि २३.३२ कोटींची रक्कम नेमकी कोणकोणत्या मार्गाने वळविण्यात आली, याचा पारदर्शक खुलासा झाल्यास या महाघोटाळ्याचे संपूर्ण चित्र नागपूरकरांसमोर येऊ शकेल, असे मत व्यक्त केले जात आहॆ. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More