– जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी की अनुभवी नेत्यावरच पुन्हा विश्वास? सामाजिक समीकरणांमुळे भाजपसमोर पेच
The Exposer
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे भाजपने मतदार नोंदणीसह निवडणुकीची तयारी मिशन मोडमध्ये सुरू केली असताना, दुसरीकडे उमेदवारीसाठी दिग्गजांच्या नावाची चर्चा व संख्या पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान ठरत आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, विजय राऊत, किशोर रेवतकर, गिरीश देशमुख आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्यासह अनेक नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२० मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. त्यामुळे प्रतिष्ठेची ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सध्या मतदार नोंदणी अभियानाची प्रमुख जबाबदारी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे, तर सुधीर दिवे यांच्याकडे सहप्रमुख म्हणून आहे. आतापर्यंत जवळपास दोन लाख मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती असून या अभियानात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या नेत्यांच्या उमेदवारीचीही चर्चा सुरू झाली आहे. सुधीर दिवे यांनी वर्धा जिल्ह्यासह नागपूर विभागात भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी काम केले आहे. नम्र व्यक्तिमत्त्व, सातत्यपूर्ण लोकसंपर्क आणि पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. नागपूर शहराऐवजी नागपूर विभागातील उमेदवाराला प्राधान्य देण्याची चर्चा असल्याने दिवे यांची दावेदारी महत्त्वाची मानली जात आहे.

दक्षिण-पश्चिम नागपूरातील भाजपचे जुने कार्यकर्ते विजय राऊत यांचेही नाव चर्चेत आहे. तीन वेळा मनपा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा आणि संघटनात्मक कामाची बांधिलकी कायम ठेवली. त्यामुळे पक्षनिष्ठेला प्राधान्य मिळाल्यास त्यांचा विचार होऊ शकतो.

किशोर रेवतकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. नागपूर जिल्ह्यात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी ग्रामीण भागातही पक्षवाढीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे यावेळी जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय झाल्यास रेवतकर यांचे नावही महत्त्वाचे ठरू शकते.
दोन वेळा नगरसेवक राहिलेले गिरीश देशमुख सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय असून मतदार नोंदणीतील त्यांच्या कामाचीही चर्चा आहे. तर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्याकडे नगरसेवक, मनपातील विविध महत्त्वाची पदे, महापौर, भाजप शहराध्यक्ष आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार असा मोठा राजकीय अनुभव आहे.
दुसरीकडे सुधाकर कोहळे यांचा दावा सर्वाधिक चर्चेत आहे. नगरसेवक, नागपूर सुधार प्रण्यासचे ट्रस्टी, आमदार, भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांना पश्चिम नागपूर मतदार संघातुन उमेदवारी दिली होती.सध्या पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची प्रमुख जबाबदारीही त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, पक्षाने अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नसल्याने इतर दावेदारांच्या आशा कायम आहेत.
भाजपसमोर आता खरा प्रश्न आहे—पुन्हा अनुभवी आणि अनेक पदे भूषविलेल्या नेत्यावर विश्वास ठेवायचा की अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यायची? उमेदवार निवडताना प्रादेशिक प्रतिनिधित्व, संघटनात्मक ताकद, जनसंपर्क आणि सामाजिक समीकरणांचाही विचार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहॆ. बसपाने संजय थुल यांच्या नावाची घोषणा केली आहॆ. तसेच इतर बहुजन संघटनांकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतविभागणीची समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत.
अखेर भाजपची उमेदवारी कोहळे, दिवे, राऊत, रेवतकर, देशमुख की सोले यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार? की पक्षश्रेष्ठी सर्वांना धक्का देत एखाद्या नव्या किंवा जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देणार? या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत नागपूर विभागाच्या राजकारणात उमेदवारीची ही रस्सीखेच चर्चेचा केंद्रबिंदू राहणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















