प्रामाणिकपणाचा आदर्श! ऑटोचालकाने परत केली साडेचार लाखांहून अधिक किमतीची बॅग

The Exposer
नागपूर : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण ठरलेल्या एका ऑटोचालकाने सापडलेली सुमारे 4 लाख 75 हजार रुपयांची बॅग कोणताही मोह न बाळगता पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिला मालकाच्या स्वाधीन केली. या प्रामाणिक कृतीबद्दल ऑटोचालकाचा लकडगंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सत्कार करून प्रशस्तीपत्र देत गौरव केला.

पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी ममता नरेश यादव, व्यवसायाने शासकीय शिक्षिका व यादव नगर येथील रहिवासी, या जुना मोठा स्टँड चौकातील अमर टॉकीजसमोर खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची महत्त्वाची बॅग हरवली होती.

या बॅगेमध्ये 1 लाख 75 हजार रुपये रोख, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये, मोबाईल फोन अंदाजे 50 हजार रुपये, तसेच तीन एटीएम/डेबिट कार्ड असा एकूण सुमारे 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
या प्रकरणाचा लकडगंज पोलीस तपास करीत असतानाच दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी रिक्षाचालक सचिन मोतीरामजी निखारे (वय 40), रा. विनोबा भावे नगर, नागपूर, यांना सदर बॅग व त्यातील सर्व मुद्देमाल मिळून आला.

क्षणाचाही मोह न बाळगता आणि कोणताही स्वार्थ न ठेवता सचिन निखारे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ही बॅग पोलीस ठाणे लकडगंजच्या माध्यमातून ममता यादव यांच्याकडे सुरक्षितपणे परत केली. त्यामुळे हरवलेला सुमारे 4.75 लाख रुपयांचा मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने संबंधित महिलेला मोठा दिलासा मिळाला. सचिन निखारे यांच्या या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची दखल घेत लकडगंज पोलिसांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

“सापडलेली वस्तू स्वतःकडे न ठेवता तिच्या खऱ्या मालकापर्यंत पोहोचविणे, हाच खरा प्रामाणिकपणा आणि सामाजिक संस्कारांचा आदर्श आहे,” अशी भावना या घटनेतून व्यक्त होत आहे. लकडगंज पोलिसांनी नागरिकांनाही अशाच प्रकारे प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More