‘वीज मीटर’ जोडण्यासाठी ₹8,500ची मागणी; सावनेरमध्ये कंत्राटी लाईनमन एसीबीच्या जाळ्यात!

– ₹5,170चे थकीत वीजबिल होते; बिलापेक्षा लाचेची रक्कम तब्बल ₹3,330 अधिक — दुकानातच रंगेहात पकडले

The Exposer
नागपूर : वीजबिल थकीत असल्याने काढून नेलेले मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी बिलाच्या रकमेपेक्षाही अधिक लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार सावनेर येथे उघडकीस आला. तक्रारदाराकडून ₹8,500ची लाच स्वीकारताना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने महावितरणच्या कार्यालयाशी संबंधित कंत्राटी लाईनमनला रंगेहात पकडले.

मुकेश चिंतामण मस्के (वय 36), आउटसोर्सिंग लाईनमन (कंत्राटी), उपकार्यकारी अभियंता कार्यालय, महावितरण, सावनेर, असे एसीबीच्या कारवाईतील आरोपीचे नाव आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार सावनेर येथे भाड्याच्या दुकानात फोटो स्टुडिओ चालवतात. दुकानाचे ₹5,170 वीजबिल थकीत असल्याने आरोपीने वीजमीटर काढून नेले होते. त्यानंतर मीटर पुन्हा जोडून देण्याच्या कामासाठी बिलाव्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला.

या मागणीविरोधात तक्रारदाराने 2 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर ₹8,500 लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.

दरम्यान, सोमवारी 7 सप्टेंबर 2026 रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराला पंचांसह दुकानात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी मस्के दुकानात आला आणि तक्रारदाराकडून ₹8,500ची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध सावनेर पोलिस ठाणे, नागपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विशेष म्हणजे, तक्रारदाराचे थकीत वीजबिल ₹5,170, तर कथित लाचेची मागणी ₹8,500 होती. म्हणजेच, वीज जोडणीच्या कामासाठी मागितलेली कथित लाच ही थकीत बिलापेक्षा ₹3,330ने अधिक ठरली. त्यामुळे या कारवाईने ‘सरकारी कामासाठी अधिकृत शुल्क किती आणि अनधिकृत मागणी किती?’ असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक भारती गुरुनुले यांनी केले. पथकात पोलीस निरीक्षक सुष्मा बिसंदरे, हेड कॉन्स्टेबल अनिल बहिरे, महिला हेड कॉन्स्टेबल अस्मिता आणि पोलीस कॉन्स्टेबल विकेश राऊत यांचा समावेश होता. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

भ्रष्टाचाराची माहिती असल्यास एसीबीशी संपर्काचे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास अथवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More