आमदार निवासाच्या दारात रक्तरंजित थरार; युवकाची धारदार शस्त्राने हत्या

हप्ता देण्यास नकार; युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून!
– आमदार निवासाजवळील हत्येचा छडा; चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

The Exposer
नागपूर : आमदार निवासाजवळील परिसरात युवकावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आलेल्या खुनाच्या प्रकरणाचा सीताबर्डी पोलिसांनी छडा लावला आहे. दुकान लावण्यासाठी पैसे देण्याची मागणी करत हप्ता उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी पंकज सुरेश नेवारे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ आकाश सुरेश नेवारे (२१) हा तेलंगखेडी, गोंडटोली खदान परिसरात राहत होता. आकाश याला यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा त्रास असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी ‘तुला दुकान लावायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील’ असे म्हणत पैशांची मागणी केली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला.

यानंतर ७ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे सभागृहामागे, सातपुडा लॉनच्या बाजूच्या गल्लीतील सिव्हिल लाइन्स परिसरात आकाशवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सीताबर्डी पोलिसांचे तपास पथक आणि गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ च्या अधिकारी-अंमलदारांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान विशाल ऊर्फ बब्बू ऊर्फ काल्या शालिकराम चव्हाण (२९), रंजीत ऊर्फ रंजू गोपालजी महतो (२५), पियुष ऊर्फ पेठा विनोद बब्बेल (३२) आणि मृणाल भोला दिवाण (२३) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी मृतकासोबत असलेल्या जुन्या वादातून संगनमत करून त्याची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More