– २० हजारांची लाच घेताना हवलदार तायडे एसीबीच्या जाळ्यात; सिपाही मेश्रामविरुद्धही गुन्हा
The Exposer
नागपूर : असंज्ञेय गुन्ह्यात तडजोड घडवून आणण्याच्या नावाखाली २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जरीपटका पोलिस ठाण्यातील हवलदार सचिन तायडे एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सिपाही मनीष उत्तम मेश्राम याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार असल्याची माहिती आहे.
एसीबीच्या या कारवाईने जरीपटका ठाण्यातील कथित व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांना पोलिस कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्यात आले आहे. त्यांच्या जागी द्वितीय पोलिस निरीक्षक प्रमोद चौधरी यांच्याकडे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
४० हजारांची मागणी; २० हजारांवर ‘सेटलमेंट’?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार युवकाचा त्याच्या चाचासोबत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादासंदर्भात जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. प्रकरण कौटुंबिक स्वरूपाचे असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यानेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
यानंतर हवलदार सचिन तायडे आणि सिपाही मनीष मेश्राम हे प्रकरण पाहत होते. मामला ‘सेटल’ करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला. अखेर २० हजार रुपयांवर तडजोड झाल्याची माहिती समोर आली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताच तायडे याला एसीबीने पकडले.
मेश्रामही आरोपी; लाचेची रक्कम घेऊन पसार?
तपासादरम्यान मनीष मेश्राम याचाही या व्यवहारात सहभाग असल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेश्राम लाचेची रक्कम घेऊन एसीबीला चकमा देत पसार झाल्याची चर्चा आहे. त्याचा शोध सुरू असून, या व्यवहारातील त्याची नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
‘दुसऱ्या कक्षात जाण्या’ची हालचालही संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणामुळे ठाण्यातील कथित पैशांच्या व्यवहारांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तायडे रक्कम स्वीकारल्यानंतर अनेकदा दुसऱ्या कक्षात जात असे आणि काही वेळाने परतत असे. या हालचालींचा लाचखोरीच्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास आता एसीबीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
तायडेला चार दिवसांची पोलिस कोठडी
एसीबीने तायडे याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे लाचेची मागणी, पैशांचा व्यवहार, मेश्रामची भूमिका तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींवर एसीबीकडून चौकशी होणार आहे.
ताकसांडे कंट्रोल रूमला; चौधरींकडे ठाण्याची धुरा
एसीबीच्या कारवाईनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांना कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले आहे. जरीपटका ठाण्याची धुरा आता द्वितीय पोलिस निरीक्षक प्रमोद चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ताकसांडे हे सेवानिवृत्तीच्या जवळ असल्याचे सांगण्यात येते.
लाचखोरीच्या कारवाईनंतर ‘कस्टडी डेथ’ची फाईल पुन्हा चर्चेत
जरीपटका ठाण्यातील लाचखोरीच्या कारवाईनंतर यापूर्वी घडलेल्या कस्टडी डेथ प्रकरणाची जुनी फाईलही पुन्हा चर्चेत आली आहे. त्या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते.
आता लाचखोरीच्या प्रकरणात पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने त्या जुन्या प्रकरणातील आरोप, तत्कालीन चौकशी आणि उपलब्ध कागदपत्रांची पुन्हा छाननी होणार का? असा सवाल पोलिस वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सध्याच्या एसीबी तपासादरम्यान कस्टडी डेथ प्रकरणाशी संबंधित काही नवे तथ्य किंवा दुवा समोर येतो का, याकडेही लक्ष लागले आहे. मात्र, एसीबीकडून त्या जुन्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जरीपटका ठाणे पुन्हा संशयाच्या सावटात
लाचखोरीच्या प्रकरणातील अटक, फरार आरोपीचा शोध, वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेली प्रशासकीय कारवाई आणि त्यानंतर पुन्हा चर्चेत आलेले कस्टडी डेथ प्रकरण—या घटनांमुळे जरीपटका पोलिस ठाण्याची कार्यपद्धती सध्या चौकशीच्या केंद्रस्थानी आली आहे.
सध्याच्या प्रकरणातील प्रत्येक कडी एसीबीच्या तपासातून उलगडत असताना लाचेचा व्यवहार केवळ दोन कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित आहे की त्यामागे आणखी काही धागेदोरे आहेत, याचे उत्तर पुढील तपासात मिळणार आहे. तायडे पोलिस कोठडीत असून मेश्रामचा शोध सुरू आहे. त्यामुळे एसीबीच्या पुढील कारवाईकडे पोलिस विभागासह नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















