“या पुरस्काराचे खरे पहिले मानकरी तुम्हीच!” पत्नी पल्लवींच्या शब्दांत केवल जीवनतारे यांच्या पत्रकारितेला सलाम

– प्रा. रणजीत मेश्राम सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरव

The Exposer
नागपूर : बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रा. रणजीत मेश्राम सामाजिक पत्रकारिता पुरस्कारासाठी पत्रकार केवल जीवनतारे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच, त्यांच्या पत्नी पल्लवी जीवनतारे यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेल्या भावनिक भावना विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.

“केवलजी, आपणास हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला झाला. केवळ मी तुमची पत्नी आहे म्हणून नव्हे, तर या पुरस्काराचा खरा मानकरी प्रतिष्ठानने ओळखला म्हणून,” अशा शब्दांत पल्लवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘या पुरस्काराचे पहिले मानकरी केवल जीवनतारेच!’

पल्लवी यांनी केवल जीवनतारे यांच्या पत्रकारितेतील सातत्य, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या भावनेचा उल्लेख करत, “या पुरस्काराचे पहिले मानकरी केवल जीवनतारेच होऊ शकतात,” असा विश्वास व्यक्त केला. प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. हा पुरस्कार मिळाला नसता तर मनात कायम खंत राहिली असती, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

प्रा. रणजीत मेश्राम यांच्या कौतुकाची आठवण

पल्लवी यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रा. रणजीत मेश्राम यांनी एका कार्यक्रमात केवल जीवनतारे यांच्या पत्रकारितेबाबत केलेल्या कौतुकाची आठवणही सांगितली. “केवल, तू जसा लिहितोस ना, तुझी जशी पत्रकारिता आहे ना, मीसुद्धा एकेकाळी असंच लिहायचो. तुझ्या बातम्या वाचल्या की मला माझ्या पत्रकारितेची आठवण होते,” असे मेश्राम सरांनी सांगितल्याचे पल्लवी यांनी नमूद केले.

‘गलेलठ्ठ पगार नाही, मोठे पद नाही; पण तुम्ही श्रीमंत आहात!’

केवल जीवनतारे यांच्याकडे मोठा पगार किंवा मोठे पद नसले, तरी माणुसकीच्या बाबतीत ते अत्यंत श्रीमंत आहेत, असे पल्लवी यांनी म्हटले आहे. खिशात केवळ दहा रुपये असतानाही समोरच्या गरजू व्यक्तीला त्यातील पाच रुपये देण्याची वृत्ती, शक्य असेल तिथे मदतीसाठी धावून जाणे आणि समोरील व्यक्तीचे समाधान होईपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहणे, या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. वैद्यकीय मदतीची गरज असो किंवा अन्य कोणतीही अडचण—दिवस असो वा रात्र—गरजूंसाठी धावून जाण्याची त्यांची धडपड कायम असते, असेही पल्लवी यांनी नमूद केले.

पत्रकारिता, सामाजिक कार्यासोबत कुटुंबाचीही जबाबदारी

सामाजिक कार्य आणि पत्रकारिता सांभाळताना कुटुंबाची आणि मुलीची जबाबदारीही ते तितक्याच जिव्हाळ्याने पार पाडतात, असे पल्लवी यांनी सांगितले. “डोक्यावर बर्फ आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून तुम्ही कायम घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवता. तुम्ही माझे सहजीवन प्रवासी आहात, याचा मला अभिमान आहे आणि तो कायम राहील,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी केवल जीवनतारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More