– साहिल वाकोडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नितीन राऊत यांची भूमिका; निष्पक्ष व वेळबद्ध चौकशीची मागणी
The Exposer
नागपूर : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप गंभीर असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळविणारे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भवितव्य आहेत. बुद्धिमत्ता, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर अपमान, भेदभाव, मानसिक छळ किंवा दबावाला सामोरे जावे लागत असेल, तर ही केवळ एका विद्यार्थ्याची नव्हे, तर देशाच्या भवितव्याची बाब आहे, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील आरोप अद्याप तपासाधीन असताना, संपूर्ण सत्य निष्पक्ष तपासातूनच समोर आले पाहिजे, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. आरोपांची सत्यता तपासणे हे तपास यंत्रणेचे काम आहे; मात्र कोणत्याही विद्यार्थ्याच्या मृत्यूकडे केवळ शैक्षणिक शिस्तीचा विषय म्हणून पाहता येणार नाही. संस्थेतील वातावरण, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि त्यांना मिळणारी वागणूक या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
रोहित वेमुला यांच्या घटनेनंतर उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव, संस्थात्मक संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा प्रश्न देशासमोर आला होता. आता पुन्हा अशाच स्वरूपाचे गंभीर आरोप समोर येत असतील, तर शासन आणि शिक्षणसंस्थांनी त्याकडे गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.
जातीच्या नावावर कोणत्याही विद्यार्थ्याला लक्ष्य करता येणार नाही
गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्याच्या सामाजिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मेरीटच्या नावाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचा सन्मान हिरावून घेता येणार नाही आणि जातीच्या नावावर कोणत्याही विद्यार्थ्याला लक्ष्य करता येणार नाही. शिक्षणसंस्था या ज्ञान, समान संधी आणि संविधानिक मूल्यांची केंद्रे असली पाहिजेत; भीती, अपमान आणि भेदभावाची नव्हे, अशी भूमिका देखील डॉ. नितीन राऊत यांनी मांडली.
या प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, परीक्षा कक्षातील परिस्थिती, विद्यार्थ्यांचे जबाब, संस्थेतील तक्रारींच्या नोंदी, संबंधित संवाद तसेच उपलब्ध अन्य पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली. चौकशीत जातीय भेदभाव, मानसिक छळ किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तथ्य आढळल्यास संबंधितांवर कोणताही दबाव न आणता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवरच शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी झाली पाहिजे
विद्यार्थ्याची जात पाहून त्याची किंमत ठरवणारी व्यवस्था भारताच्या संविधानाला मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवरच शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी झाली पाहिजे. देशाच्या भवितव्याला घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण देणे ही शासनासह प्रत्येक शिक्षणसंस्थेची जबाबदारी आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
Author: संतोष तायडे
संपादक















